Tue, May 21, 2019 22:25होमपेज › Kolhapur › तोफ नव्हतीच तर चोरीला जाणार कशी

तोफ नव्हतीच तर चोरीला जाणार कशी

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 12:34AM

बुकमार्क करा

पन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळा येथील पंचायत समिती परिसरातून शिवकालीन तोफ चोरीस गेल्याची चुकीची व दिशाभूल करणारी बातमी रविवारी काही वर्तमानपत्रांतून (दैनिक ‘पुढारी’ नव्हे) प्रकाशित झाली; पण त्या ठिकाणी नसलेल्या व न झालेल्या चोरीची चर्चा दिवसभर पन्हाळ्यात सुरू होती. मुळात पंचायत समितीसमोर तोफा ठेवण्यात आल्याच नव्हत्या, तर तोफ चोरी होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, अशी माहिती गटविकास अधिकारी  सौ. प्रियदर्शनी मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पन्हाळा नगरपालिका, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तोफ चोरीच्या निराधार वृत्ताच्या प्रसिद्धीनंतर नगराध्यक्षा सौ. रूपाली धडेल यांनी तातडीने  तोफा बसविण्यात आलेल्या ठिकाणी पाहणी केली व सर्व तोफा सुस्थितीत व जाग्यावर असल्याची माहिती दिली. पन्हाळ्याबाबत विनाकारण गैरसमज पसरविणार्‍या समाजकंटकांची शोधमोहीम सुरू असून, त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हा पोलिसप्रमुखांना   निवेदन  देणार असल्याचे सौ. धडेल  यांनी सांगितले.

पन्हाळ्यातील तोफ चोरीबाबतची बातमी दिशाभूल करणारी व खोटी असून, अशा अफवांवर लोकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन नगराध्यक्षा धडेल यांनी केले. पन्हाळा पंचायत समिती सभापती पृथ्वीराज सरनोबत यांनीही तोफ चोरीला गेल्याची बातमी खोटी आहे,  पंचायत समिती परिसरात तोफा कधीही नव्हत्या, तर चोरी होतील कशा? असा सवाल उपस्थित होता. अनिल कंदुरकर म्हणाले, तोफा नव्हत्या, तर होत्या म्हणून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. हे योग्य नाही. पत्रकार परिषदेस रणजित शिंदे, नगरसेवक दिनकर भोपळे, पुरातत्त्व विभागाचे फोरमन विजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.