Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Kolhapur › स्वच्छतेची सप्तपदी

स्वच्छतेची सप्तपदी

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:07PM

बुकमार्क करा
पन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ शहर अभियान 2018’साठी संपूर्ण शहरात स्वच्छता व रंगरंगोटी, तसेच स्वच्छताविषयक घोषवाक्यांच्या भिंतींचे रेखाटन सुरू आहे. पन्हाळा शहरास देशातील टॉप टेनच्या शहरांत समाविष्ट करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.  पन्हाळा  नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. रूपाली धडेल यांनी केले आहे. पन्हाळा येथे सुमारे पाच किलोमीटर परिसर नगरपालिका हद्दीत समाविष्ट होत असून, पावनगड परिसरदेखील गावठाण हद्दीतच आहे.

या गावची लोकसंख्या तीन हजार आहे; पण पर्यटनस्थळ असल्याने येथे दरवर्षी पाच लाख लोक भेट देतात. या पाच लाख पर्यटकांची गणना फ्लोटिंग पॉपिलेशन होत असून, त्या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासनास सेवासुविधा पुरवाव्या लागतात.  नागरिकांना घरातून पालिकेच्या माध्यमातून ओला व सुखा कचरा साठवण्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर  केले आहे. प्रत्येक घरात या दोन-दोन कुंड्यांचे लवकरच वाटप होईल. पन्हाळा येथील सांडपाणी व्यवस्थापनासाठी तळ्याच्या बागेत वेस्ट वॉटर प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्लांटमधून सांडपाणी शुद्ध करून ते झाडांना वापरण्यात येणार आहे.

डास निर्मूलन, गटार स्वच्छतेबाबत ‘स्वच्छता’ अ‍ॅपद्वारे नागरिकांना सुविधा दिल्या जात आहेत. ‘आपणच आपला पन्हाळा चला सुंदर बनवूया, हरित बनवूया,’ असा नारा देत युद्धपातळीवर स्वच्छताविषयक कामे सुरू झाली आहेत.