Wed, Jan 23, 2019 23:58होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी खा. राजू शेट्टींकडून अनास्था

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी खा. राजू शेट्टींकडून अनास्था

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 20 2018 10:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून अनास्था झाली असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात केंद्र सरकारकडे त्यांनी काहीही पाठपुरावा केला नसल्यानेच  इचलकरंजीसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, असे माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात माने यांनी म्हटले आहे की ,करवीर तालुक्यातील बालिंगेपासून कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरांसह सुमारे 40 गावांना पंचगंगेचे दूषित पाणी प्यावे लागते आहे. यापैकी कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपने पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचे काम सुरू झाले आहे. इचलकरंजी शहरासह पंचगंगेच्या काठावरील 39 गावांना दूषित पाणी प्यावे लागत असून ही सर्व गावे खा. शेट्टी यांच्या मतदारसंघात येतात. या गावांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पंचगंगा शुद्धीकरण हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कोल्हापूरप्रमाणे प्रत्येक गावाला थेट पाईपने पाणी पुरविणे शक्य नाही. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणविरहित राहण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेने 2014 मध्ये 30 गावांचा सांडपाणी आणि सहा गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा 108 कोटी रुपयांचा आराखडा महाराष्ट्र शासनाकडे पाठविला असून तो राज्य शासनाने लगेचच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचलनालयाकडे पाठविला आहे. जर त्याचा पाठपुरावा खासदारांकडून झाला असता तर आज इचलकरंजीचाही पाणी प्रश्‍न पेटला नसता, असा दावा या निवेदनात केला आहे. देशातील अनेक नद्यांचे प्रदूषण हटविण्यासाठी सरकारने निर्णय घेतला असून त्यात पुण्याच्या मुळा-मुठा व नाशिकच्या गोदावरीचा समावेश झाला, पण कोल्हापूरच्या पंचगंगेचा समावेश झाला नाही. यात खासदार पाठपुराव्यात कमी पडल्याचे दिसते, असा आरोप माने यांनी केला आहे.