Tue, Sep 25, 2018 02:41



होमपेज › Kolhapur › पंचगंगा नदीची पातळी स्थिर 

पंचगंगा नदीची पातळी स्थिर 

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:22AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेची पातळी गुरुवारी 33 फुटांवर गेली. दिवसभर पातळी स्थिर राहिली. प्रमुख 14 धरणांपैकी केवळ एक धरण वगळता सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील अद्याप 46 बंधारे पाण्याखालीच आहेत.

जिल्ह्यात गुरुवारीही पावसाने चांगली उघडीप दिली. अधूनमधून कोसळणारी सर आणि त्यानंतर पडणारे कडकडीत ऊन असा ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. पावसाने विश्रांती घेतली तरी धरण परिसरात चांगला पाऊस होत आहे. यामुळे धरणात होणारी पाण्याची आवकही सुरूच आहे. परिणामी धरणातील विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने घट होत नसल्याचे चित्र आहे. नद्यांची पाणी पातळी अनेक ठिकाणी स्थिर आहे. यामुळे काही भागातील पूरस्थिती कायम आहे.

जिल्ह्यातील नऊ नद्यांवरील 46 बंधार्‍यांवर पाणी आहे. यामुळे त्यावरील वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून बंदच आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू असल्याने अनेक गावांचा थेट संपर्क तुटलेलाच आहे. पावसाची उघडीप, पण अनेक दिवसांपासून पूरस्थिती असे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चित्र आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. यामुळे सकाळी केवळ 5 व्या क्रमांकाचा एक दरवाजा खुला होता. धरणातून एकूण 3 हजार 28 क्युसेक विसर्ग सुरू राहिला. दुधगंगेचा विसर्ग 4 हजार क्युसेकवरून सायंंकाळी 6 हजार करण्यात आला. वारणेचा विसर्गही 8 हजार 166 क्युसेक  इतका होता. चिकोत्रा धरण वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाऊस कमी झाला तरी धरणातील विसर्ग आणि कृष्णा नदीची वाढत चाललेली पाणी पातळी यामुळे पंचगंगेची पातळीही वाढत चालली आहे. बुधवारी रात्री 32.10 फुटांवर पाणी पातळी होती, ती आज सकाळी सहा वाजता 33.6 फुटांपर्यंत गेली. दुपारी चारनंतर ही पाणी पातळी 33.5वर स्थिर होती. 

दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 14.31 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात 41.83 मि.मी.इतका झाला. गगनबावड्यात 28.50 मि.मी., राधानगरी 19.83 मि.मी.,भुदरगडमध्ये 18.80 मि.मी.,आजर्‍यात 14.75 मि.मी.,चंदगडमध्ये 13.83 मि.मी.,पन्हाळ्यात 10.86 मि.मी., करवीरमध्ये 9.55 मि.मी.,कागलमध्ये 8 मि.मी., हातकणंगले व गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी 3 मि.मी. तर शिरोळ तालुक्यात 1.57 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीसह चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या कालावधीत अतिवृष्टी झाली.

दरम्यान, पावसाने जिल्ह्यात एक जूनपासून आजअखेर तब्बल 1 हजारांवर घरांची पडझड झाली आहे. यामुळे सुमारे 2 कोटी 71 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.