Sat, Jun 06, 2020 09:52होमपेज › Kolhapur › ‘नमामि’साठी पंचगंगेचा प्रस्ताव

‘नमामि’साठी पंचगंगेचा प्रस्ताव

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या नमामि गंगा उपक्रमात कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचाही समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे पाठवला आहे. 

विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी कोल्हापुरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांना पंचगंगा प्रदूषण हा विषय नवीन नाही. त्यांच्या काळात पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे डॉ. म्हैसेकर यांच्याकडून हा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठवला जाईल. 

नमामि योजनेतून गंगा, चंद्रभागा, वाराणसी आदी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. असाच निधी पंचगंगेसाठी मिळू शकतो, असे या प्रस्तावात म्हटले आहे. या निधीतून शहरातील 110, तर इचलकरंजीतील 112 किलोमीटरचे अंतर्गत नाले पूर्ण करणे, ग्रामीण भागात पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारणे, निर्माल्य विसर्जनासाठी नदीकाठावर उपाययोजना करणे, थेट नदीत मिसळणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारणे आदी कामे करता येतील. 

बालिंगा, शिंगणापूरसह नदीकाठावरील बहुतांश गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते, त्याला आळा घालण्याची गरज आहे.  जिल्ह्याबरोबरच नदीची भौगोलिक माहिती, घनकचरा निर्मूलन व प्रदूषणाची सद्यःस्थिती याचीही माहिती या अहवालात देण्यात आली आहे.