होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : पंचगंगा धोका पातळीवर

कोल्हापूर : पंचगंगा धोका पातळीवर

Published On: Jul 18 2018 2:18AM | Last Updated: Jul 18 2018 2:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पाण्यात वाढ सुरूच आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता पंचगंगेने धोक्याची पातळी गाठली. पंचगंगेला आलेल्या महापुराने पूरस्थिती बिकट होत चालली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शिवाजी पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी रात्रीपासून बंद केला. दरम्यान, दुपारी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बालिंगा पुलापासून बंद करण्यात आली. रेडे डोह दुपारी फुटला असून, कोणत्याही क्षणी पंचगंगेची मच्छिंद्री होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 85 बंधार्‍यांवर, 59 रस्त्यांवर पाणी आल्याने सुमारे 200 हून अधिक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग आजही बंदच राहिला. कोल्हापूर-पन्हाळा, रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून असणारा पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. काही काळ तर ऊनही पडले होते. मात्र, अधूनमधून पडणारा पाऊस दमदार कोसळत होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळनंतर मात्र पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच राहिली. सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 41.7 फुटांवर होती. दिवसभर पातळीत सुमारे एक फुटाने वाढ झाली. पंचगंगेची पातळी रात्री नऊ वाजता 42.10 फुटांपर्यंत पोहोचली. रात्री दहा वाजता पंचगंगेने 43.01 फूट ही धोका पातळी गाठली.

शिवाजी पूल बंदचा फटका

पंचगंगेने धोका पातळी गाठल्याने जिल्हा प्रशासनाने शिवाजी पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला. शिवाजी पुलाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हा प्रशासनाला सोमवारी पत्र दिले होते, त्यानुसार आज सकाळपासून दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना पुलावरून प्रवेश दिला जात होता. रात्री हा पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. करवीरचे प्रभारी तहसीलदार संतोष सानप यांनी परिसरात स्पीकरद्वारे पूल वाहतुकीसाठी बंद केल्याच्या सूचना दिल्या. यामुळे या पुलावरून प्रवास करणार्‍या शेकडो नागरिकांना त्याचा फटका बसला. तावडे हॉटेल, शिये, भुये, वडणगेमार्र्गे कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर नागरिकांना यावे लागत होते. मात्र, वडगणे-पन्हाळा मार्गावरही पाणी आल्याने त्यावरील वाहतूकही उशिरा बंद झाली.

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग आजही बंदच राहिला. या मार्गावर मरळीनजीक पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. यासह बालिंगा पुलाजवळही भोगावती नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने दुपारी चार वाजता येथील वाहतूकही बंद करण्यात आली. कोल्हापूर-राजापूर मार्गही पूर्णपणे ठप्पच आहे. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर तीन ठिकाणी पाणी आले. केर्ली येथील पाण्याची पातळी वाढल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद करण्यात आली.

रेडे डोह फुटला

आज दुपारी चारच्या सुमारास रेडे डोह फुटला. सायंकाळपर्यंत या ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. रात्री या ठिकाणची पाणी पातळी वाढली. यामुळे आंबेवाडीपुढील वाहतूकही बंदच राहिली. आंबेवाडीत दुपारी नागरी वस्तीत पाणी आले. यासह चिखली रस्त्यावरही तीन ठिकाणी पाणी आले. त्यातूनच नागरिक ये-जा करत होते. रात्री पाण्याची पातळी वाढल्याने त्यावरील वाहतूकही बंद झाली. पाणी पातळी वाढत गेली, तर चिखलीला पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. शहरातही पंचगंगेचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. 

अनेक गावांचा संपर्क तुटला

गगनबावडा तालुक्यातील टेकवाडीला पुराचा वेढा कायम आहे. यासह पन्हाळा तालुक्यातील गोठे पुलापलीकडील सात गावे, जांभळी खोर्‍यातील सुमारे 40 हून अधिक गावे, करवीर तालुक्यातील बीड धरणापलीकडील सुमारे 35 गावे आदींचा पूर्ण संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे आणि 59 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेलाच आहे.

जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होत चालल्याने जनजीवनही विस्कळीत होत चालले आहे. पुरामुळे घराबाहेर पडणे अनेकांना शक्य होत नसल्याने शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांतील उपस्थितीवर परिणाम झाल्याचे चित्र होते, बाजारपेठांतही गर्दी कमी जाणवत होती. दळणवळण ठप्प झाल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर होते.

पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे आदेश

जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक गतिमान केली आहे. नागरिकांचे स्थलांतर तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकार्‍यांना दिल्या आहेत. शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात आज त्यांनी पाहणी केली. यावेळी नदीकाठावरील, तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सात तालुक्यांत अतिवृष्टी

दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. आठ तालुक्यांसह सर्वच धरणांच्या परिसरात धुवाँधार पाऊस झाला. गगनबावड्यात 183 मि.मी., तर राधानगरी तालुक्यात 108 मि.मी. पाऊस झाला. आजरा (95), चंदगड (76), कागल (70), पन्हाळा (76), शाहूवाडी (82), भुदरगड (67) या तालुक्यांतही अतिवृष्टी झाली. हातकणंगले 47 मि.मी., शिरोळमध्ये 40 मि.मी., करवीरमध्ये 61 मि.मी., तर गडहिंग्लजमध्ये 26 मि.मी. पाऊस झाला.

 कोेदे धरण परिसरात तब्बल 290 मि.मी. पाऊस झाला. कुंभी परिसरातही 240 मि.मी. पाऊस झाला. तुळशी धरणात 183 मि.मी., दूधगंगा 143 मि.मी., कासारी 155 मि.मी., पाटगाव 130 मि.मी., चिकोत्रा 115 मि.मी., चित्री 138 मि.मी., जंगमहट्टी 108 मि.मी., घटप्रभा 181 मि.मी., जांबरे 132 मि.मी. पाऊस झाला. वारणा परिसरात 97 मि.मी., तर कडवी परिसरात 85 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पुराचा धोका वाढणार

वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून सध्या 18 हजार 112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातूनही 7 हजार 888 क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचगंगेची पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे.