Tue, Mar 19, 2019 09:41होमपेज › Kolhapur › पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले

पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना सुनावले

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 11:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सन 2013-14 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवालातील मुद्द्यांंवर  बुधवारी पंचायत राज समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची साक्ष घेतली. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करत असताना काही विभागांच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावल्याचे समजते. अहवालात उपस्थित करण्यात आलेल्या 153  मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै. वसंतराव नाईक समिती सभागृहात समितीचे कामकाज सुरू आहे. गुरुवारी (दि. 6) ही समिती तालुक्यांचा दौरा करणार आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती बुधवारपासून दौर्‍यावर आली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली. याठिकाणी समितीचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. समितीचे कामकाज दिवसभर चालले. आज पहिल्या दिवशी सन 2013-14 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकण अहवालातील 153 परीच्छेदांवर  सुनावणी झाली. यामध्ये सर्वात अधिक 24 मुद्दे शिक्षण विभागाचे होते. याशिवाय समाजल्याण विभागाचे 22, पाणीपुरवठा योजना 7, ग्रामपंचायत 5, बांधकाम 16, लघुपाटबंधारे 7, आरोग्य 6, पशुसवंर्धन 10, वित्त विभाग 7, महिला व बालकल्याण 3, सामान्य प्राशसन विभाग 1 आणि उर्वरित पंचायत समितीशी संबंधित मुद्दे होते.

गुरुवारी ही समिती तालुक्यांना भेटी देणार आहे. प्रथम पंचायत समितीना भेटी देणार असून, नंतर काही प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाने ही समिती पाहणार आहे. यासाठी चार गट करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार दीपक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर यांचा समावेश आहे. ते गगनबावडा, राधानगरी व भुदरगड पंचायत समितींना भेटी देणार आहेत. दुसर्‍या गटाचे प्रमुख आमदार दिलीप सोपल आहेत. त्यात आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार दत्तात्रय सावंत व आमदार श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे. हे शाहूवाडी, पन्हाळा व करवीर पंचायत समितींना भेटी देणार आहेत. आमदार प्रा. वीरेंद्र जगताप हे तिसर्‍या गटाचे प्रमुख आहेत. यात आमदार चरण वाघमारे, आमदार रणधीर सावरकर,   आमदार राहुल मोटे यांचा समावेश आहे. ते हातकणंगले, कागल व शिरोळ पंचायत समितींना भेटी देणार आहेत. आमदार भरतशेठ गोगावले हे चौथ्या गटाचे प्रमुख आहेत. त्यात आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर व आमदार विक्रम काळे यांचा समावेश आहे. ते चंदगड, आजरा व गडहिंग्लज पंचायत समिंतीना भेटी देणार आहेत. याठिकाणी गट विकास अधिकार्‍यांची साक्ष घेण्यात येणार आहे.