Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Kolhapur › अबब..! पंचगंगा नदी गेली चोरीला ; तक्रार दाखल (video)

अबब..! पंचगंगा नदी गेली चोरीला ; तक्रार दाखल (video)

Published On: Jun 11 2018 6:01PM | Last Updated: Jun 11 2018 6:01PMहातकणंगले : प्रतिनिधी

हातात काठी, डोक्यावर मुंडासं, मच्छीमारांच्या डोक्यावर मासे पकडण्याचे जाळे आणि हातात टोपली अशा पेहरावात “आमची पंचगंगा चोरीला गेली,” अशी हाक देत पंचगंगा नदीकाठावरील मंडळी सोमवारी हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाली. पंचगंगा चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करून घ्या, अशी मागणी आंदोलकांंनी केली; पण पंचगंगा प्रदूषित झाली की चोरीला गेली, यावर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल व नागरिकांत वाद झाला. अखेर आंदोलकांच्या भावनांचा उद्रेक पाहून पंचगंगा नदी चोरीस गेल्याची फिर्याद हातकणंगले पोलिसांनी नोंदवून घेतली.

दरम्यान, पंचगंगा प्रदूषित करणार्‍या घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे वैभव असलेली पंचगंगा नदी ही पूर्णत: प्रदूषित झाली आहे. नदीवर जलपर्णीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रूकडी (ता. हातकणंगले) व आसपासच्या गावांतील छोट्या मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. नदीचे प्रदूषण करणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा व पूर्वीसारखे स्वच्छ नदीचे पाणी मिळावे, नदीमध्ये पाण्याऐवजी जलपर्णीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ‘पंचगंगा चोरीला गेली आहे...’ असेही निवेदनात म्हटले आहे. मात्र, नदी चोरीला गेल्याची बाब तांत्रिकद‍ृष्ट्या नोंदवून घेता येणार नाही, अशी भूमिका हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक डुबल यांनी घेतली आणि वादाला सुरुवात झाली; पण अखेर आंदोलकांच्या संतप्‍त भावना पाहून डुबल यांनी फिर्याद नोंदवून घेतली.

दुपारी एकच्या सुमारास रूकडी (ता. हातकणंगले) येथून जि.प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार व धनगर समाजाच्या आंदोलकांनी हातात टोपले, जाळी अशा वस्तू घेऊन हातकणंगले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे आजपर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. अनेक कारखान्यांचे दूषित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते, तसेच मैलामिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळले जाते. पंचगंगा पूर्णपणे प्रदूषित झाली असून, सर्वत्र केंदाळ पसरले आहे. त्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय बंद पडला असून, उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नदी चोरीला गेल्याची फिर्याद देऊन शासनाचे डोळे उघडण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला.

यावेळी पंचायत समितीचे माजी  सदस्य बबलू मकानदार, रूकडीचे सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, नंदू साठे आदी उपस्थित होते.