Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Kolhapur › पंचगंगेलाच आता हवाय न्याय!

पंचगंगेलाच आता हवाय न्याय!

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:51AMकोल्हापूर : विजय पाटील

लाखो लोकांची तहान भागवणारी. भूक शमवणारी. पंचगंगा नदी प्रदूषणाचे ओझे वाहून थकली आहे. त्यामुळे नदीच्या मूळ प्रवाहात काही ठिकाणी सातत्याने बदल दिसू लागला आहे. नदीच्या अंतर्गत सौंदर्य असणार्‍या जलचर प्राण्यांचे अस्तित्वही आता कमी होऊ लागले आहे. पंचगंगा बचाव असे अध्येमध्ये अजूनही  हाकारे घातले जाताहेत. सोशल मीडियावर सुरू असलेली पंचगंगा बचावाची चळवळही आता थंडावली आहे.  नदी म्हणजे माय असं मानणार्‍या आपल्या संस्कृतीला साक्षी ठेवून पंचगंगेचा डोह सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी तरुणाईनेच नव्या जोमाने प्रदूषणमुक्‍तीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण आता पंचगंगेलाच न्याय हवाय. 

पंचगंगा स्वच्छ आणि सुंदर असावी, हा सर्वांचाच आग्रह आहे. परंतु, हा आग्रह असूनही मागील तीन दशके पंचगंगेचे प्रदूषण वाढतच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोक संघर्षशील आहेत तसेच कार्यप्रवण आहेत. त्यामुळे  एका बाजूला पंचगंगा प्रदूषणमुक्‍तीसाठी रस्त्यावर लढा देत असतानाच 1997 साली उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करून कायद्याने  जबाबदार सरकारी यंत्रणांना झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी 2010 साली याबाबत पुन्हा याचिका दाखल केली. न्यायालयाने आदेश देऊनही याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे पाहून देसाई यांनी याचिका दाखल केली. इचलकरंजी येथील कामगार युनियनचे नेते दत्ता माने, अ‍ॅड.  जयंत बलगुडे, सदाशिव मलबादे आदींसह नागरीकांनी नदी प्रदूषणाची व्याप्ती भयंकरझाल्याने 2012 साली प्रदूषण रोखण्यासाठी  उच्च न्यायालयात  जनहित याचिका दाखल केली. माणसे आणि मासे यांचे बळी जाणे हे नित्याचे झाल्यासारखा प्रकार बनला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनाही नदीकाठावर निवांत सुस्त पडलेल्या मगरीसारख्या बनल्या आहेत. अधिकारी येतात आणि जातात मात्र ठोस धोरण कोणीही राबवत नाही.   

दुसर्‍या बाजूला शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील नदीचा प्रवाह हा प्रदूषित नाल्यासारखाच दिसतो. पाण्याचा रंग गडद हिरवागार आणि काळसर ठिपक्यांचा दिसतो. कारण कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील सांडपाण्याचे ओझे घेत ही नदी जसजशी पुढे वाहते तशी प्रदूषणाची मात्रा जास्त होत जाते. नदीकाठावरील गावांनी सांडपाणी नदीत मिसळू नये याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पूर्ण यशस्वी झालेला नाही. 

आता पून्हा एकदा पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा नारा द्यायला हवा. यासाठी प्रत्येक नागरिकाने नदी प्रदूषित होणार नाही याची वैयक्‍तिक पातळीवर दक्षता घ्यायला हवी. सोशल मीडियावर नदी प्रदूषणमुक्‍तीच्या नुसत्या चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायला हवा. यासाठी पुन्हा नव्याने यल्गार करण्याची गरज आहे.     

Tags : Kolhapur, Kolhapur News,Panchaganga river, just want justice, panchganga river pollution issue