Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › उगमापासूनच प्रदूषणाचा शाप!

उगमापासूनच प्रदूषणाचा शाप!

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 11:01PMकोल्हापूर : सुनील कदम

जगाच्या पाठीवरील किंवा देशातील कोणत्याही नदीच्या प्रदूषणास प्रामुख्याने त्या नदीच्या मध्यापासून सुरुवात होताना दिसते. म्हणजे उगमापासून ते मध्यापर्यंत त्या- त्या नद्यांचे पाणी शुद्धच असते. मात्र, हे गणित पंचगंगेला लागू होत नाही. कारण, अगदी उगमापासूनच किंवा उगमपूर्व स्रोतापासूनच पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा पडलेला दिसतो आणि त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे पंचगंगेच्या शुद्धीकरणाची सुरुवात ही नदीच्या उगमपूर्व स्रोतांपासून करण्याची गरज आहे.

भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी या पंचगंगेच्या उपनद्या असून, प्रयाग चिखली येथे एकत्र आल्यानंतर त्यांचे पंचगंगेत रूपांतर होते. पंचगंगेच्या या उपनद्यांपैकी एकही नदी ही नैसर्गिकरीत्या बारमाही नाही. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावरच या नद्यांचे प्रवाहीपण अवलंबून आहे. पंचगंगेसह तिच्या उपनद्यांवर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासह अन्य कारणांसाठी एकूण 64 ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या बंधार्‍यांची उपयुक्तता अनन्यसाधारण असली, तरी याच बंधार्‍यांमुळे पंचगंगेसह तिच्या उपनद्यांचे नैसर्गिक प्रवाहीपण ठिकठिकाणी खंडित होऊन त्यांना साचलेपण प्राप्त झालेले आहे. नदी वाहती राहिली तर नैसर्गिकरीत्याच तिचे शुद्धीकरण होते. मात्र, पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांना साचलेपण प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक शुद्धीकरणाचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. तशातच साखर कारखान्यांमधील प्रदूषित पाणी आणि नदीकाठच्या गावांमधील सांडपाणी या नद्यांच्या साठलेल्या पाण्यात मिसळून प्रयाग चिखलीमध्ये त्यांचे पंचगंगेत रूपांतर होण्यापूर्वीच या नदीचे जवळपास 50 टक्के पाणी प्रदूषित झालेले दिसते. त्यानंतर नदीला पूर्णपणे विषारी करून टाकण्याचे काम कोल्हापूर आणि इचलकरंजी ही दोन शहरे करताना दिसतात.

कोल्हापूर शहरातून वाहणारे एकूण 127 नैसर्गिक नाले असून, त्यापैकी जयंती, दुधाळी, लक्षतीर्थ, जामदार क्लब, सिद्धार्थनगर, सीपीआर, राजहंस प्रेस, रमणमळा, धोबीघाट, कसबा बावडा आणि बापट कॅम्प हे बारा प्रमुख नाले आहेत. या नैसर्गिक नाल्यांमधून शहरातील सर्वच प्रकारचे सांडपाणी पंचगंगेच्या नदीपात्रात मिसळते. जयंती नाला हा या सर्व नाल्यांचा मेरूमणी शोभेल एवढा अवाढव्य नाला असून, या एकाच नाल्यातून दररोज 40 दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगेत मिसळते. 

पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांना बंधार्‍यांमुळे जे साचलेपण प्राप्त झाले आहे ते संपविण्याची गरज आहे. याचा अर्थ बंधारे काढून टाकणे असा नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बंधारे वेळोवेळी त्यांच्या शिरोभागाऐवजी पायातून प्रवाही ठेवणे. जेणेकरून बंधार्‍यांमधील गाळ आणि अन्य टाकाऊ पदार्थ नैसर्गिकरीत्याच प्रवाहीत होतील. त्या माध्यमातून किमान पावसाळ्याच्या चार महिन्यांत तरी पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांचे अनेकवेळा नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण होण्यास मदत होईल. मानवनिर्मित प्रदूषण रोखण्यासाठीही कठोर पावले उचलावी लागतील. मात्र, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आणि प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. केवळ कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरांमुळे होणार्‍या नदी प्रदूषणाला आळा घातला, तरी पंचगंगेचे निम्मे शुद्धीकरण होऊन जाईल.    (क्रमश:)