Tue, Feb 19, 2019 13:00होमपेज › Kolhapur › पलूसच्या अपहरणकर्त्याची आत्महत्या की घातपात?

पलूसच्या अपहरणकर्त्याची आत्महत्या की घातपात?

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 23 2018 1:38AMजोतिबा : वार्ताहर

जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी आढळलेला मृतदेह हा इस्लामपुरातील एका उद्योजकाच्या अपहरण प्रकरणातील फरार संशयित आरोपी वाहिद सिकंदर पठाण (रा. पलूस, जि. सांगली) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पठाण याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान, वाहिद याची आत्महत्या नसून, त्याचा कोणी तरी घातपात केल्याची फिर्याद त्याचे वडील सिकंदर पठाण यांनी कोडोली पोलिसांत दिली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की काही घातपात? याचा तपास कोडोली पोलिस करीत आहेत. 

दि. 15 एप्रिल रोजी कार्यालयात मारहाण करून व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून चौघांनी इस्लामपूर येथील उद्योजक वैभव शामराव यादव यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अनिल यशवंत माने (वय 30, रा. बोरगाव, ता. तासगाव), धनंजय मारुती वाटेकर (20, रा. कराड) आणि अजिंक्य शंकर हुकिरे (23, सध्या रा. कराड, मूळ गाव पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना कराडमध्ये अटक केली आहे. तर वाहिद पठाण हा घटना घडल्यापासून फरार होता. दरम्यान, शनिवारी (दि. 21) जोतिबा डोंगराच्या पश्‍चिमेच्या पायथ्याशी एका अज्ञात 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाच्या खिशातील मतदान ओळखपत्रावरून हा मृतदेह वाहिद पठाणचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

वाहिदची आत्महत्या नसून, कोणीतरी त्याचा घातपात करून मृतदेह येथे टाकल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी कोडोली पोलिसांत दिली आहे.  वाहिद हा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करीत होता. यामध्ये तो आर्थिक अडचणीत आल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान, वाहिदने आत्महत्या केली आहे की त्याचा घातपात झाला आहे? याचा तपास पोलिस करीत आहेत.

Tags : Kolhapur, Palus, accident, suicide, Assault