Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरात येत्या 4 जुलैपूर्वी पगारी पुजारी

अंबाबाई मंदिरात येत्या 4 जुलैपूर्वी पगारी पुजारी

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:49AMमुंबई : चंद्रशेखर माताडे

अंबाबाई मंदिरात येत्या दि. 4 जुलैपूर्वी पगारी पुजार्‍यांची नेमणूक करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. विधिमंडळाने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी पातळीवर लगबग सुरू झाली आहे.

अंबाबाई मंदिराचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्षांसह आठ सदस्यांचा समावेश असणार आहे. सध्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत अंबाबाई मंदिर आहे. अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा विधिमंडळाने संमत केल्याने कायद्याप्रमाणे ही समिती स्वतंत्रपणे अस्तित्वात आणण्यात येणार आहे. त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. त्याचा दर्जा हा उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी असणार नाही.विधी व न्याय खात्याकडून याबाबतचा आढावा घेतला जात आहे. बुधवारी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व सचिवांसमवेत एक बैठक येथे झाली. अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार व सदस्य उपस्थित होते. पुढील महिन्यात याबाबत पुन्हा बैठक होणार असून, त्यापूर्वी कायद्याप्रमाणे नियम तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे समजते.