Thu, Apr 25, 2019 07:34होमपेज › Kolhapur › ‘पगारी पुजारी’ नियुक्‍ती प्रक्रिया देवस्थानतर्फे सुरू

‘पगारी पुजारी’ नियुक्‍ती प्रक्रिया देवस्थानतर्फे सुरू

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शासननियुक्त पगारी पुजारी नेमण्याबाबात कायदा झाला. कायद्याची अंमलबजावणीबाबत अद्याप अद्यादेश निघाला नसला तरी कामकाज मात्र सुरु झाले आहे. देवस्थान समितीकडे पगारी पुजारी पदासाठी 113 अर्ज दाखल झाले असून मंगळवार दि. 19 जून पासून पुजारी पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.  पुजारी पदाच्या नियुक्तीसाठी सात तज्ञ लोकांची समिती नियुक्त केली असून त्यांच्याकडूनच मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे समजते. 

28 मार्च रोजी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचा कायदा विधान परिषदेत मांडण्यात आला. याला दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळून 12 एप्रिल रोजी कायद्याचे गॅझेट झाले; पण अद्याप कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल भाविकांकडून केला जात होता. 

अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधी व नित्यक्रम सांभाळण्यासाठी जे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्या मनुष्यबळासह पगारी पुजारी नियुक्‍ती केली जाणार आहे. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी होईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पुजारी पदासाठी मुलाखती घेऊन त्यातून धार्मिक विधीमध्ये पारंगत व्यक्‍तींची निवड केली जाणार आहे. 

दि. 19, 20 व 21 जून रोजी तज्ज्ञ निवड समितीकडून मुलाखती होतील. यातून 11 प्रमुख पुजारी व 35 सहायक पुजारी पहिल्या टप्प्यात निवडले जाणार आहेत. या पुजार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जाणार आहे. पुजारी नेमणूक करताना त्यांच्याकडे धार्मिक विधींचे शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, त्यांना अंबाबाई मंदिरात चालणारे नित्यक्रम, धार्मिक विधी, देवीची पूजा, काकडा, शेजारतीपासून सर्व सोपस्कार कसे केले जातात याचे ज्ञान असणे आवश्यक मानले जाणार आहे. याशिवाय देवीची सालंकृत पूजा बांधता येणारे पुजारी नेमले जाणार आहेत.

सर्व निवड प्रक्रिया पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती हाताळणार असून, निवड होणार्‍या पुजार्‍यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेचा अहवाल विधी व न्याय विभागाला दिला जाणार आहे. साधारण जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुजारी पदाशिवाय क्‍लार्क, शिपाई, व्यवस्थापक नेमणुकीसह मंदिरासाठी 100 पोलिसांची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभारली जाणार आहे. 

... अशी आहे निवड समिती

देवस्थान समितीकडून पगारी पुजारी नेमण्यासाठी तज्ज्ञ सात व्यक्‍तींची समिती नियुक्‍त केली आहे. यामध्ये गणेश नेर्लेकर-देसाई, शिवदास जाधव, शंकराचार्य पीठाकडील एक तज्ज्ञ व्यक्‍ती, देवस्थान समिती सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, सदस्य शिवाजी जाधव यांचा समावेश असून समितीचे अध्यक्ष महेश जाधव असणार आहेत.