Thu, Nov 15, 2018 10:31होमपेज › Kolhapur › पगारी पुजारी; देवस्थान समितीकडे २५ अर्ज दाखल

पगारी पुजारी; देवस्थान समितीकडे २५ अर्ज दाखल

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 17 2018 11:27PMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंबाबाई मंदिरात पगारी पुजार्‍यांची नेमणूक केली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, अंबाबाई मंदिर देवस्थान हे समितीपासून अलग करून मंदिरासाठी स्वतंत्र समिती कार्यरत होणार असल्याने आलेल्या अर्जांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. 

उन्हाळी अधिवेशनात राज्य शासनाने अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी विधेयक मंजूर केले. राज्यपालांच्या साक्षीने याचे कायद्यात रूपांतर होऊन महिना उलटला तरी कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल मात्र धिम्या गतीने सुरू आहे. विधेयक मंजूर होण्यापूर्वी देवस्थान समितीने पगारी पुजारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद लाभला. 25 अर्ज दाखल झाले.

यापैकी पाच ते सहा अर्ज वगळता अन्य सर्व अर्ज वैदिकशास्त्रात पारंगत असलेल्या पुजार्‍यांचे आहेत. नव्या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाणार हे स्पष्ट नसल्याने पुजारी भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. वैदिकशास्त्रात पारंगत असलेल्या पुरोहितांचे अर्ज असले तरी त्यांना अंबाबाई मंदिरातील नित्यक्रमाची माहिती असणे तसेच हे नित्यक्रम बिनचूकपणे करण्याची त्यांचे कौशल्य आहे का? या गोष्टी पडताळून पाहण्याची गरज आहे. 

शिवाय देवीची अलंकारिक पूजा, शुक्रवारी होणारा पालखी सोहळा या सर्वाची नियमितता कायम रहावी, अशी मागणी भक्तांकडून होत आहे. त्यामुळे पुजार्‍यांची नेमणूक करताना समितीला पुजार्‍यांना अंबाबाई मंदिरातील नित्यक्रम व धार्मिक बाबींचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.