Thu, Apr 25, 2019 18:49होमपेज › Kolhapur › पॅकेज कारखान्यांना; दरवाढ ग्राहकांना

पॅकेज कारखान्यांना; दरवाढ ग्राहकांना

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:14PMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

केंद्र सरकारने साखर कारखानदारी अडचणीत असल्याचे ओळखून व कारखानदारांकडून मदतीसाठी सातत्याने केल्या जात असणार्‍या पाठपुराव्यामुळे आठवडाभरापूर्वी 8 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे साखर उद्योगाला बर्‍यापैकी दिलासा मिळाला असतानाच साखरेच्या दरामध्ये प्रतिक्‍विंटल 300 ते 400 रुपये वाढ झाल्याने ग्राहकांना मात्र साखर कडूच ठरू लागली आहे.

जागतिक व देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखर उद्योगाबाबत दराच्या उतरणीमुळे चिंतेचे वातावरण होते. यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यांना मदतीचा हात पुढे करून दिलासा द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. परवडत नसतानाही कारखान्यांतर्गत असणार्‍या ऊस उचलीच्या स्पर्धेमुळे जाहीर केलेल्या एफआरपी रकमाही ऊस उत्पादकांना देताना यावर्षी कारखानदारांची चांगलीच दमछाक झाली आहे. 

साखरेचे दर कोसळल्याने उत्पादन खर्चही साखर विक्रीतून निघेनासा झाला. दरम्यान, साखर कारखानदारांनी सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा ठेवून केंद्र सरकारच्या दरबारी पाठपुरावा चालू केला होता. याचा गांभीर्याने विचार करत केंद्र सरकारने 8500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या निर्णयामुळे साखर कारखानदारांबरोबरच ग्राहक देखील सुखावला होता. प्रत्यक्षात मात्र गेल्या आठवडाभरापासून साखरेच्या दरात वाढच होऊ लागली आहे. 

एकीकडे कारखानदारांना पॅकेज जाहीर झाले असताना पॅकेज जाहीर होण्यापूर्वी घसरलेले दर पॅकेज जाहीर झाल्यानंतर मात्र वाढू लागल्याने सर्वसामान्य ग्राहकवर्गाचे बजेट कोलमडू लागले आहे. 2900 रुपये क्‍विंटलने उपलब्ध होणारी साखर आता 3400 रुपये प्रतिक्‍विंटलच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. यामुळे सर्वसामान्यांना साखर दिवसेंदिवस कडूच ठरू लागली आहे.