Sun, May 26, 2019 17:42होमपेज › Kolhapur › पाटाकडीलची विजयी घोडदौड सुरूच...

पाटाकडीलची विजयी घोडदौड सुरूच...

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:26AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाने आपली विजयी घोडदौड अखंड राखत मंगळवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळावर 2-0 अशा गोलफरकाने मात केली. यामुळे साखळी फेरीतील दुसर्‍या फेरीअखेर पाटाकडीलने 6 गुणांसह आघाडी कायम राखली आहे. 

पाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुप आयोजित ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धेतील तिसरा साखळी सामना मंगळवारी यजमान पाटाकडील विरुद्ध बालगोपाल यांच्यात झाला. सुरुवातीपासून बालगोपालने पाटाकडीलला काट्याची टक्‍कर दिली. श्रीधर परबच्या पासवर रोहित कुरणेने मारलेला हेड गोलपोस्टला लागला. यानंतर सचिन गायकवाडने केलेली खोलवर चढाई फोल ठरली. पाटाकडीलकडूनही आघाडीसाठी चढाया सुरूच होत्या. ओंकार जाधवचा फटका बालगोपालचा गोलरक्षक निखील खन्‍ना याने फोल ठरविला. ओंकारचा दुसरा प्रयत्न पोलवरून गेला. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता. 

उत्तरार्धातही दोन्ही संघांचा आक्रमक पवित्रा कायम होता. आघाडीसाठी चढाओढ सुरूच होती. यात पाटाकडीलने बाजी मारली. 48 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री कीकवर सैफ हकीमकडून मिळालेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटील याने हेडद्वारे गोल नोंदवत आघाडी मिळविली. चढाईत बेसावध बचावफळी भेदत ऋषिकेश मेथे-पाटील याने दुसर्‍या गोलची नोंद केली. यानंतर त्यांच्या अक्षय मेथे-पाटील, ओमकार जाधव यांच्या चढाया अपयशी ठरल्या. दोन गोल्सने पिछाडीवर असणार्‍या बालगोपालकडून गोल फेडण्यासाठी शर्तीने प्रयत्न झाले. सूरज जाधवचा सुरेख फटका गोलरक्षक विशाल नारायणपुरेने झेपावत रोखला. श्रीधर परब व सूरज जाधवची संयुक्‍त चढाई अपयशी ठरली. त्यामुळे सामना त्यांनी 2-0 असा जिंकला.  

सामनावीर : ऋषिकेश मेथे-पाटील (पाटाकडील), प्रतीक पोवार (बालगोपाल). 
आजचा सामना : दिलबहार तालीम विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लब, सायंकाळी 4 वाजता.