Sat, Jul 20, 2019 21:23होमपेज › Kolhapur › ‘फुटबॉल महासंग्राम’ही पाटाकडीलने जिंकला

‘फुटबॉल महासंग्राम’ही पाटाकडीलने जिंकला

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:45AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात पूर्वार्धात मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर वृषभ ढेरे याने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळाने बालगोपाल तालीम मंडळाचा पराभव करून ‘चंद्रकांत चषक फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. इतकेच नव्हे तर सन 2017-18 या फुटबॉल हंगामात एकही स्पर्धा प्रतिस्पर्धी संघाचा टिकाव लागू न देता सलग पाच स्पर्धा जिंकत संपूर्ण हंगामावर कब्जा मिळविला. 

सॉकर अ‍ॅमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई) आयोजित ‘चंद्रकांत चषक फुटबॉल’ महासंग्राम स्पर्धेने यंदाच्या फुटबॉल हंगामाची सांगता छत्रपती शाहू स्टेडियमवर शनिवारी झाली. पावसामुळे सुमारे आठवडाभर लांबणीवर पडलेल्या अंतिम सामन्याची उत्सूकता तमाम फुटबॉल शौकिनांना लागून राहिली होती. दरम्यान, स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रकार झाल्याचा आरोपही सोशल मीडियावरून झाला होता. यामुळे नेमका प्रकार काय? याचीही उत्सुकता फुटबॉलप्रेमींना लागली होती.

बचावाची चूक पडली महागात

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळ झाला. बालगोपालकडून आघाडीसाठी आक्रमक चढाया करण्यात आल्या. ऋतुराज पाटीलने डाव्या पायाने मारलेला जोरदार फटका गोलरक्षक विशाल नारायणपुरेने काढला. रोहित कुरणेचा चांगला प्रयत्न अपयशी ठरला. पाटाकडीलकडून वृषभ ढेरे, ऋषिकेश मेथे-पाटील, ओमकार जाधव, ओंकार जाधव यांनी आघाडीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. 27  व्या मिनिटाला झालेली चढाई रोखण्याच्या प्रयत्नात बालगोपालच्या गोलक्षेत्रात बचावफळीकडून हँडबॉल झाल्याने मुख्य पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर वृषभ ढेरे याने बिनचूक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात रूपेश सुर्वे, ऋषिकेश, ओंकार जाधव यांनी आघाडीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले.

रोहितने संधी दवडली

उत्तरार्धात बालगोपालकडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, श्रीधर परब यांनी लागोपाठ चढाया सुरू ठेवल्या. एक चढाई पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात अवैद्यरीत्या रोखल्याने पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. या संधीचे सोने करता आले नाही. रोहितचा बेभरवशाचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. यामुळे सामना पाटाकडीलने 1-0 असा जिंकत अजिंक्यपद 
पटकाविले. 

शानदार उद्घाटन, बहारदार बक्षीस वितरण

शनिवारी सायंकाळी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन झाले. यावेळी बाबुराव चव्हाण, आशिष कोरगावकर, आकाश कोरगावकर, शिवाजी पाटील, उदय दुधाणे, दीपक चोरगे, उत्तम कोराणे, भैया शेटके, फेनिक्स सरोगाती, चंद्रकांत जाधव, संभाजी जाधव, अजित चव्हाण, पो.नि. अनिल गुजर आदी उपस्थित होते. बक्षीस समारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक योगेश कुलकर्णी, सत्यजित जाधव, महेंद्र चव्हाण, विजेंद्र चव्हाण, देवेंद्र चव्हाण, नगरसेविका जयश्री जाधव, सुनंदा जाधव, माधवी सूर्यवंशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील, साईचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी आदींच्या हस्ते झाला. निवेदन विजय साळोखे व शिवाजीराव ढवाण यांनी केले. सामना पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांतील महिलांसाठी स्कूटी बाईक व पैठणी तर पुरुषांसाठी दुचाकी भेट देण्यात आली. 

लकी ड्रॉतून भाग्यवानांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट गोलरक्षकाचे बक्षीस पाटाकडीलच्या विशाल नारायणपुरे याला मिळाले नसल्याने संघाने बक्षीस समारंभावर बहिष्कार टाकून मैदान सोडले. काही वेळाने त्यांच्या समर्थकांनी त्यांची समजूत काढून सर्वांना परत मैदानात आणल्यानंतर बक्षीस समारंभ पार पडला.