Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › पीटीएम -दिलबहार बरोबरीत 

पीटीएम -दिलबहार बरोबरीत 

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:33PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

आघाडीसाठी जलद हलचाली, योजनाबद्ध चाली, खोलवर चढाया आणि आक्रमक खेळाला तितक्याच बचावात्मक पद्धतीने मिळणारे चोख प्रत्युत्तर अशा अटीतटीने रंगलेला सामना पूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिला. ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील गुरुवारची लढत दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ यांच्यात  झाली. 

छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या प्रारंभीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला.  जलद खेळ करत आघाडीसाठी जोरदार चढाया सुरू झाल्या. पाटाकडीलकडून रोहित पोवार, समीर पठाण, ऋषिकेश मोरे, सुनित पाटील, शुभम मोहिते, रोहन कांबळे यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. पण दिलबहारच्या भक्‍कम बचावफळीमुळे त्यांना गोलची नोंद करता आली नाही.

दिलबहारकडून ओंकार शिंदे, रोहन पाटील, प्रशांत आजरेकर, शशांक माने, प्रतीक व्हनाळीकर, रोहित जाधव यांनी  केलेल्या चढाया फिनिशिंग अभावी आणि पीटीएमच्या भक्‍कम बचावामुळे अपयशी ठरल्या. यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत  होता. 

उत्तरार्धात पीटीएमकडून ओंकार देवणेच्या पासवर रोहन कांबळेची संधी वाया गेली. ओंकारचा फटका गोलपोस्ट जवळून गेला. समीर पठाण व आकाश काटे यांच्या संधी हुकल्या. रोहन, समीर व रोहित यांचे प्रयत्नही अपयशी ठरले. दिलबहारकडून प्रशांत आजरेकरच्या पासवर रोहन पाटीलचा प्रयत्न फोल ठरला. प्रतीक व्हनाळीकरच्या पासवर ओंकार शिंदेची संधी वाया गेली. प्रशांत आजरेकर, स्वप्निल भोसले यांच्या चढाया अपयशी ठरल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 

आजचे सामने 
 साईनाथ स्पोर्टस् वि. उत्तरेश्‍वर तालीम, दुपारी 2 वाजता. 
 प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ वि. खंडोबा तालीम, सायंकाळी 4 वाजता.