Sun, Jul 21, 2019 02:02होमपेज › Kolhapur › दोन जिल्हाध्यक्षांच्या जवळिकीची खमंग चर्चा

दोन जिल्हाध्यक्षांच्या जवळिकीची खमंग चर्चा

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:51AMराशिवडे : प्रवीण ढोणे

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात सध्या चांगलीच जवळीक वाढली आहे. दोघेही विधानसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरणार असून, ‘एकमेका सहाय्य करू...’च्या धर्तीवर ते तयारीला लागले आहेत. या जवळीकतेमुळे करवीरसह राधानगरी-भुदरगड मतदारसंघात नवे राजकीय समीकरण जुळण्याचे संकेत आहेत. 

भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर वर्षभरापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील-सडोलीकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची जवळीक वाढली आहे. पी.एन. हे करवीरमधून, तर ए.वाय. हे राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. पी.एन. यांना मानणारा मोठा गट राधानगरी तालुक्यात असल्याने ए.वाय. यांना पी.एन. गटाच्या पाठिंब्याची गरज आहे. करवीर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा तुरळक गट आहे. या गटाची ताकद पी.एन. यांच्या पाठीशी लावण्यासाठी ए.वाय. प्रयत्न करत आहेत. साधारणत:, दोघेही जिल्हाध्यक्ष असल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी त्यांचीच शिफारस महत्त्वाची असते. त्यामुळे या दोघांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

एकमेकांना फायदा

ऐनवेळी उमेदवारीसाठी दगाफटका झाला, तरी भाजपची उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी ए.वाय. यांनी सुरू केली आहे. राधानगरी मतदारसंघामध्ये पी.एन. यांची ताकद महत्त्वपूर्ण आहे. त्यांना मानणारा मोठा गट तालुक्यात कार्यरत आहे. करवीरमध्ये पी.एन. यांचा अवघ्या सातशे मतांनी पराभव झाला होता. बेरजेचे राजकारण करत शेकापच्या राजू सूर्यवंशी या युवा नेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. करवीरमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य जास्त प्रमाणात नसले, तरी येणार्‍यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

संदर्भ बदलले...

प्रामुख्याने गतवेळी करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये पी.एन. व ए.वाय. यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने पी.एन. व के. पी. पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. आता मात्र राजकारणाचे संदर्भ बदलत आहेत. ए.वाय. स्वत:च निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांनी पी.एन. यांच्याशी सलोखा ठेवून साधलेली जवळीक खमंग चर्चेचा विषय ठरला आहे.