Fri, Jul 19, 2019 07:17होमपेज › Kolhapur › ऑईल गळतीने कारखान्याला भीषण आग; मालकाचा मृत्यू

ऑईल गळतीने कारखान्याला भीषण आग; मालकाचा मृत्यू

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:45PMकोल्हापूर : प्रतिनिधी

उद्यमनगर - वाय. पी. पोवारनगर येथील के. एस. चव्हाण इंडस्ट्रिजला फर्नेस ऑईल पाईप गळतीमुळे शुक्रवारी (दि.31) सकाळी लागलेल्या भीषण आगीत कारखाना मालकाचा होरपळून मृत्यू झाला. नरसिंहराव लक्ष्मण चव्हाण (वय 65, रा. टाकाळा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते.

दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून अ‍ॅल्युमिनियम वितळवण्याच्या भट्टीसह पाच हजार लिटर फर्नेस ऑईल साठ्याच्या टाकीला भडकलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे कारखान्यातील कामगारांचे प्राण वाचले. शिवाय, उद्यमनगर - वाय. पी. पोवार परिसरातील दुर्घटना टळली. या घटनेमुळे कामगार भेदरलेल्या स्थितीत होते.

भांडी कारखानदार चव्हाण व त्यांच्या बंधूंचे उद्यमनगर-वाय. पी. पोवारनगरात अ‍ॅल्युमिनियम भांडी तयार करण्याचा व्यवसाय आहे. के. एस. चव्हाण इंडस्ट्रिज ही फर्म नरसिंहराव चव्हाणांच्या मालकीची असून, तेथे पंधराहून अधिक कामगार कामाला आहेत.  

दोन दिवसांपासून ऑईलची गळती
अतिउष्ण भट्टीला फर्नेस ऑईल पुरवठा करणारी पाईप दोन दिवसांपूर्वी लिकेज झाली आहे. गुरुवारी सकाळी मालकांनी पाईपची गळती काढण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. त्याच स्थितीत सायंकाळी पाच हजार लिटर फर्नेस ऑईलचा टाकीमध्ये साठा करण्यात आला. परिणामी, ऑईल गळतीचे प्रमाण आणखी वाढले. रात्रीपासून भट्टीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऑईल साचलेले होते.

लिकेज थांबविण्याचा प्रयत्न निष्फळ
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमाराला कारखान्यातील कामगारांनी भट्टी पेटवून ऑईलचा पुरवठा सुरू केला असता, फर्नेस ऑईल गळतीचे प्रमाण वाढल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. कारखानदार चव्हाण यांना माहिती देण्यात आली. संजय सुतार (वय 50), शिवाजी पाटील (54) या कामगारांसमवेत चव्हाण ऑईल टाकीजवळ गेले. पाईपला कापड गुंडाळून तात्पुरत्या स्वरूपात लिकेज थांबविण्याचा प्रयत्न झाला; पण यश आले नाही.

आगीचे रौद्ररूप : पत्रेही उडाले
मालक चव्हाण स्वत: शिडीवरून पाईपला कापड बांधतांना लिकेजचे अचानक प्रमाण वाढले. अतिउष्ण भट्टीवर ऑईल पडताच मोठा भडका झाला. त्यात चव्हाण होरपळले. त्याही स्थितीत कारखानदार शिडीवरून खाली पळत आले. अवघ्या काही क्षणात त्यांचे सर्वांग भाजले. कारखान्यातील अन्य कामगारांनी जीवाच्या आकांताने मालकांना ओढत बाहेर काढताक्षणी आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. शेडवरील पत्रे उडून आगीच्या ज्वाळा आकाशात झेपावल्या होत्या.  दोन दिवसांपूर्वीच चव्हाण पत्नी, मुलीसमवेत पुण्याला गेले होते. पत्नीला मुलीकडे थांबवून ते कोल्हापूरला परतले होते.