Sun, Apr 21, 2019 14:13होमपेज › Kolhapur › जगात तब्बल 4.80 कोटी जोडपी वंध्यत्वाने त्रस्त

जगात तब्बल 4.80 कोटी जोडपी वंध्यत्वाने त्रस्त

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:30AMकोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

 2015 मध्ये झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात जगात 4 कोटी 80 लाख जोडपी वंध्यत्वाने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय समाजरचनेत वंध्यत्वाला स्त्रीच कारणीभूत असल्याविषयी गैरसमज असला, तरी वैद्यकीय कारणमीमांसेमध्ये 40 टक्के जोडप्यांमध्ये पुरुष कारणीभूत असल्याचे सत्य पुढे आले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही पुरुष आपल्या वंध्यत्वाची तपासणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. पुरुषांमधील शुक्राणूंमध्ये असणारे सूक्ष्म दोष त्याला कारणीभूत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाल्याने हे सूक्ष्म दोष कसे तपासायचे, याचा भारतीय रुग्णांवर अभ्यास करून मार्गदर्शक असे सचित्र पुस्तक तयार करण्यात आले आहे. आजवर परदेशातील रुग्णांच्या संकलित माहितीवर आधारित पुस्तकांच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु, आता  ‘अ‍ॅटलास ऑफ ह्यूमन सिमेन अ‍ॅनालिसीस’ हे नवे पुस्तक भारतीय वैद्यकीय शास्त्राला नवी दिशा देऊ शकेल.

पुरुष वंध्यत्वाला कारणीभूत ठरणार्‍या शुक्राणूंमधील अतिसूक्ष्म दोषांची ‘फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप’ या अत्याधुनिक सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी करून कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटल व रिसर्च फौंडेशनचे संशोधक डॉ. सतीश पत्की व त्यांच्या सहकार्‍यांनी सहा हजार रुग्णांवरील तपासणीच्या निकषावर आधारित वैद्यकीय क्षेत्रासाठी माहितीचा अमूल्य ठेवा उपलब्ध केला आहे. हा ठेवा सचित्र व शास्त्रीय माहिती असलेल्या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध झाला असून भारतातील रुग्णांच्या समस्या व माहितीच्या आधारे तयार झालेला देशातील हा पहिला दस्तऐवज वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान तर ठरेलच. शिवाय, देशातील दोषरहित जन्मांना अटकाव करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे.

‘अ‍ॅटलास ऑफ ह्यूमन सिमेन अ‍ॅनालिसीस’  या नावाने वैद्यकीय शास्त्रातील अत्यंत मोलाच्या संशोधनाची माहिती असलेल्या या पुस्तकाचे रविवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार व महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात येईल. हे पुस्तक देशातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, वंध्यत्व चिकित्सा, शरीरशास्त्र, शरीर विकृतीशास्त्र यांच्यासह  अन्य क्षेत्रांतील तज्ज्ञ संशोधक, डॉक्टर्स आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शक ठरेल. तसेच या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान संकलित झालेल्या माहिती व निष्कर्षावर आधारित ‘आधुनिक जीवनशैली व पुरुष वंध्यत्व’ या विषयावरील अनेक संशोधक प्रबंध येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित होतील, असा विश्‍वास डॉ. सतीश पत्की यांनी येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. विशेष म्हणजे हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच ई-शॉपिंगच्या संकेतस्थळावर त्याला पंचतारांकित मानांकनही मिळाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.