Fri, Jul 19, 2019 01:25होमपेज › Kolhapur › देशात 14 हजार कोटींची ऊसबिले थकीत

देशात 14 हजार कोटींची ऊसबिले थकीत

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 11 2018 11:45PMकुडित्रे : प्रतिनिधी 

साखर विक्रीवरील बंधने, साखरेच्या घसरलेल्या किमती व साखरेच्या उत्पादनाचा उच्चांक यामुळे देशात ऊस उत्पादकांची 14 हजार कोटी रुपयांची ऊसबिले थकल्याची कबुली इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने पत्रकात दिली आहे. ही थकबाकी साखर उद्योगाच्या इतिहासातील विक्रमी आहे.

सर्वोच्च साखर उत्पादन 
15 मार्च 2018 पर्यंत गेल्या हंगामातील याच कालावधीतील साखर उत्पादनापेक्षा या हंगामातील साखर उत्पादन 47 टक्क्यांहून अधिक आहे. देशातील एकूण 523 साखर कारखान्यांपैकी 106 साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.  आय.सी.आर.ए. या रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार देशात चालू गळीत हंगामात (ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2018) सुमारे 295 लाख मे. टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे. गत हंगामापेक्षा हे उत्पादन 40 टक्के अधिक आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांत विक्रमी साखर उत्पादन झाल्याचा हा परिणाम आहे.
15 मार्चअखेर महाराष्ट्रात 94 लाख मे. टन, उत्तर प्रदेश 84 लाख मे. टन, कर्नाटकात 35 लाख मे. टन व इतर राज्यांत 45 लाख मे. टन साखर उत्पादन झाले आहे.

थकबाकी विक्रमी
विविध राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशातील साखर आयुक्तांच्या आकडेवारीनुसार 31 जानेवारीअखेर देशात सुमारे 14 हजार कोटी रुपयांची ऊसबिले थकलेली आहेत.फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत उत्पादित साखरेपैकी केवळ 30 टक्के साखरेचीच विक्री झाली आहे. आणि उर्वरित 70 टक्के उत्पादित साखर गोदामात पडून आहे. मार्च 2018 अखेरही थकबाकी विक्रमी असेल, अशी भीती ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे.

साखर दरातील घसरण चिंतेची

‘इस्मा’च्या अहवालानुसार साखरेच्या दरातील घसरण चालूच असून देशाच्या पश्‍चिम आणि दक्षिण भागांत साखरेच्या किमती प्रतिक्वटल 2900 च्या आसपास आहेत. उत्तर भारतात हे दर प्रतिक्िंवटल 3,000 च्या आसपास आहेत. साखरेच्या प्रतिक्िंवटल 3500 रुपये ते 3600 रुपये या प्रक्रिया खर्चाचा विचार केला, तर कारखाने  प्रतिक्िंवटल 600 ते 700 रुपयांनी तोट्यात आहेत. परिणामी, कारखाने ऊसबिले वेळेवर देऊ शकत नाहीत.

Tags : 14,000 crores, sugar bill pending, kolhapur news