Fri, Apr 26, 2019 03:42होमपेज › Kolhapur › ‘बाहेरील’ ऊस गाळपात ‘रस’

‘बाहेरील’ ऊस गाळपात ‘रस’

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:43PMसुळकूड : एम. वाय. भिकाप्पा पाटील

जिल्ह्यातील बर्‍याच साखर कारखान्यांनी ऊस टंचाईच्या निमित्ताने मखलाशी करीत नजीकच्या कर्नाटक राज्यातील सीमावर्ती क्षेत्रातील बिगर सभासद शेतकर्‍यांच्या उसाच्या वारेमाप आयातीचे धोरण अवलंबिल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी कारखान्यांच्या सभासदांचे व कार्यक्षेत्रातील बिगर सभासदांच्या नोंदलेल्या उसाचे गाळप मागे पडल्याने उसास तुरे येऊन उत्पादनात कमालीची घट होत आहे. यासाठी राज्य शासनाने परराज्यातील ऊस आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

ऊस टंचाईच्या हंगामात सभासद व कार्यक्षेत्रातील बिगर सभासदांच्या नोंदलेल्या उसाचे गाळप आटोक्यात आल्यानंतरच कार्यक्षेत्राबाहेरील व परराज्यातील ऊस कारखान्यांनी गळितास आणणे संयुक्तिक ठरले असते. परंतु, जिल्ह्यातील बर्‍याच कारखान्यांनी गळिताच्या उच्चत्तम उद्दिष्टपूर्तीसाठी सभासदांचे व नोंदलेल्या उसाचे गाळप मागे ठेवताना सभासदहिताचा विसर पडल्याचे दाखवून दिल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. याउलट कार्यक्षेत्राबाहेरील व परराज्यातील गेटकेन ऊस गळितावर भर देण्याचे विपरीत तंत्र बर्‍याच कारखान्यांनी सुरू ठेवल्याचेही दिसत आहे. 

नजीकच्या कर्नाटक राज्यातील बरेच कारखाने फक्त पहिली उचल देतात. त्यानंतर उसावर दुसरा हप्ता व अंतिम बिल देणार्‍या कारखान्यांची संख्या तेथे नगण्य आहे. या उलट कोल्हापूर जिल्ह्यात मात्र उसास एफआरपी पेक्षाही जादा दर मिळत असून बहुतांश कारखान्यांकडून दुसरा हप्ता व अंतिम बिलही नियमित अदा केले जाते. अशा स्थितीत कर्नाटकातील शेतकर्‍यांना इकडे ऊस पाठविणे ही एक पर्वणीच मानली जाते. त्यासाठी तोडणी मजुरांना प्रतिएकर 3 ते 4 हजार  खुशाली रक्कम आणि वाहनचालकांनाही प्रति खेपेस रु. 500 पर्यंत एंट्री देत आहेत. 

जिल्ह्यातील बर्‍याच कारखान्यांकडून सर्रासपणे तर काही कारखान्यांकडून मल्टिस्टेटच्या नावाखाली बाहेरील ऊस आयात होत आहे. त्यामुळे सभासदांचा व कार्यक्षेत्रातील ऑगस्ट, सप्टेंबर 2016 मधील 16-17 महिन्यांच्या आडसाली लागण उसाचे गळीत अद्याप सुरू आहे, तर परराज्यातील 10-12 महिन्यांच्या लागण, खोडवा, निडवा उसाचे गाळप होत असल्याचे सभासद शेतकर्‍यांना निमूटपणे पहावे लागत आहे.