Tue, Jul 07, 2020 22:15होमपेज › Kolhapur › पंचगंगा चौथ्यांदा पात्राबाहेर

पंचगंगा चौथ्यांदा पात्राबाहेर

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारी पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पंचगंगा चौथ्यांदा पात्राबाहेर पडली. चार नद्यांवरील 17 बंधारे पाण्याखाली गेल्याने काही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. 

जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू होती. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरण परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. सोमवारी जिल्ह्यात दिवसभर दमदार पाऊस झाला. धरण परिसरातही पावसाचा जोर कायम होता. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील सात धरण परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. तुळशी, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, जांबरे आणि कोदे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. अन्य धरण परिसरातही दमदार पाऊस झाला.

पावसाने धरणांतील पाणीसाठा वाढत चालला आहे. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे. तुळशी धरणाचा विसर्ग सोमवारी एक हजार क्युसेकने वाढवण्यात आला. यामुळे धरणातून सध्या 1,511 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी 8.34 टी.एम.सी. इतका झाला आहे. राधानगरी आणि तुळशी धरणांतून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेचे पाणी आज सकाळी पुन्हा पात्राबाहेर पडले. सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 26.7 फुटांवर होती, तरी सकाळी 11 वाजता 26.11 फुटांपर्यंत गेली. सायंकाळी सहा वाजता ती 27.10 फुटांपर्यंत गेली.

वारणा धरण परिसरातही पावसाचा जोर आहे. यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग 1,715 क्युसेकने वाढवण्यात आला आहे. वारणा धरणातून 6 हजार 86 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 

वारणा नदीचे पाणी काही ठिकाणी पात्राबाहेर पडले असून, नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  दूधगंगा धरणातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. दुपारी 4 पासून धरणातून 6 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे दुधगंगा नदीवरील सुळंबी बंधारा पाण्याखाली गेला. भोगावती नदीवरील खडक कोगे, सरकारी कोगे आणि तुळशी नदीवरील बीड बंधारा पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 28.91 मि.मी.पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे 70 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 39.83 मि.मी., शाहूवाडीत 36.83 मि.मी., भुदरगडमध्ये 34.80 मि.मी., चंदगडमध्ये 35.66 मि.मी., पन्हाळ्यात 23.57 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 15.85 मि.मी., आजर्‍यात 27.50 मि.मी., करवीरमध्ये 18.27 मि.मी., कागलमध्ये 27 मि.मी., हातकणंगलेत 9.37 मि.मी. तर शिरोळ तालुक्यात 8.71 मि.मी. पावसाची नोंद झाली.गेले दोन दिवस झालेल्या पावसाने ऑगस्टची सरासरी 32 टक्क्यांवर गेली तर वार्षिक सरासरीच्या 67 टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात पावसाने आजअखेर 800 घरांची, 11 सार्वजनिक इमारती आणि 32 जनावारांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात सुमारे 2 कोटी 3 लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. पावसाने 7 दुधाळ जनावारांचा मृत्यू झाला असून सहा व्यक्तींचाही बळी गेला आहे. मृत व्यक्तीपैकी दोन प्रकरणे अद्याप पात्र ठरली असून त्यापैकी एकाच्या कुटूंबाला शासकीय मदत देण्यात आली आहे. 
‘राधानगरी’चे दोन दरवाजे दुसर्‍यांदा खुले

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस कोसळत असल्यामुळे सोमवारी सकाळी 10.45 वाजता धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे दुसर्‍यांदा खुले झाले. या दरवाजांतून 2,856 क्युसेक, तर वीजनिर्मितीसाठी 1,600 क्युसेक असा एकूण 4,456 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यापूर्वी 20 जुलैला धरण पूर्ण क्षमतेने भरून दोन दरवाजे खुले झाले होते. 

गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार सुरुवात केल्याने सकाळी 10.45 वाजता तीन व सहा क्रमांकाचे दरवाजे खुले झाले. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत 60 मि.मी. पाऊस झाला असून, जूनपासून आजअखेर 3,996 मि.मी. पाऊस झाला आहे. राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. धरणात 8,346.67 द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा असून, 347.42 फूट पाणी पातळी आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी 1,600 क्युसेक, तर दोन दरवाजांमधून 2,856 क्युसेक असा एकूण 4,456 क्युसेक विसर्ग सुरू असून, तारळे व शिरगाव बंधार्‍यांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने सुरू आहे.