Fri, Jul 19, 2019 13:42होमपेज › Kolhapur › ...अन्यथा कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या फोडतील

...अन्यथा कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या फोडतील

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 25 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा, आतापर्यंत हा समाज शांत होता, यापुढे समाजातील तरुण मंत्र्यांच्या गाड्याही फोडतील, असा इशारा काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी दिला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी औरंगाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने याच मागणीसाठी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. मंगळवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्याचवेळी कोल्हापुरात याच मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन दसरा चौकात सुरू करण्यात आले. 

दरम्यान, या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आज दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील विविध पक्ष, संघटना, व्यक्‍तींनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. शाहीरविशारद आझाद नायकवडी यांच्या पोवाड्यांनी या आंदोलनाला अधिकच बहर आला. नायकवडी यांनी शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या जीवनावरील पोवाड्यांबरोबरच मराठा समाजाचा जागरही पोवाड्यांतून केला. 

या आंदोलनस्थळी आज विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. त्यात काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, युवा सेनेचे ऋतुराज क्षीरसागर, दापोलीचे ऋषीकेश गुजर, निवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, शहर काँगे्रसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, राजू लाटकर यांचा समावेश होता. कोतोली (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र दिलीप देसाई यांच्याकडे दिले. 

यावेळी बोलताना पी. एन. पाटील यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आंदोलनात भाडोत्री लोक नाहीत. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. चार वर्षांपासूनची ही मागणी आहे; पण सरकार त्याला तयार नाही. मराठा समाजाने यापूर्वी शांततेत राज्यभर मोर्चे काढले. आता या समाजातील तरुणांच्या संयमाचा अंत संपला असून, प्रसंगी हे तरुण मंत्र्यांच्या गाड्याही फोडतील.

घोषणांनी चौक दणाणला

दसरा चौकात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान दिलेल्या घोषणांनी चौक दणाणून गेला. ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षणाशिवाय नवी भरती करू नये’ यासारख्या घोषणा दिल्या जात होत्या. 

खुशाल कोंबडं झाकून धरा...

‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा,’ अशा मार्मिक शब्दांत शाहीर आझाद नायकवडी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्धार व्यक्‍त केला. नायकवडी यांनी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आज विविध पोवाडे सादर केले. त्यांना पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शिवाजी लांडगे, स्वराज्य नायकवडी, भार्गव कांबळे, बापूसाहेब साळोखे यांनी साथ दिली. 

आज आंदोलनात... 

उद्या, गुरुवारी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशन, इलेक्ट्रिक असोसिएशनचे पदाधिकारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहिरीचा कार्यक्रमही उद्या होणार आहे. 

आरक्षण आमच्या हक्‍काचे...


गडहिंग्लज : प्रतिनिधी

औरंगाबाद येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या गडहिंग्लज बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. इतरवेळी एखाददुसरे दुकान उघडे असायचे. आजच्या बंदवेळी मराठा समाज बांधवांच्या तीव्र भावना दिसून आल्याने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता एकानेही दुकान सुरू ठेवले नाही. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली. याबरोबरच गडहिंग्लज आगारातील एस.टी.च्या 400 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. ‘आरक्षण आमच्या हक्‍काचे...’ यासारख्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. 
गडहिंग्लजचा आठवडी बाजाराचा दिवस हा मंगळवार असल्याने बंदचा फारसा परिणाम शहरात जाणवला नव्हता.

 राज्यभर सर्वत्र कडकडीत बंद पाळला गेला असताना तालुक्यात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी असोसिएशन यांनी प्रतिसाद देत यामध्ये सहभागी होत कडकडीत बंद पाळला.