Wed, Feb 20, 2019 06:34होमपेज › Kolhapur › कात्यायनी मंदिरात चोरी; देवीचे दागिने लंपास

कात्यायनी मंदिरात चोरी; देवीचे दागिने लंपास

Published On: Sep 12 2018 12:52PM | Last Updated: Sep 12 2018 12:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कळंबा येथील कात्यायणी मंदिरातील देवीचे दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी पहाटेला उघडकीला आली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किंमतीचा चांदीचा मुकूट, पंचारतीसह अन्य  ऐवज लंपास केला.

कात्यायणी मंदिरात रामचंद्र गुरव पुजारी म्हणून काम करतात. आज (बुधवारी) पहाटे पुजेसाठी ते मंदिरात आले. यावेळी गाभार्‍यातील दरवाजा तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दर्शन मंडपातील लोखंडी कपाट उचकटण्यात आले होते. कपाटातील ऐवज लंपास करण्यात आला होता. इतर दोन चांदीचे ताटे, पितळी भांडी व देणगीची काही रक्कम सुरक्षित आहे.

श्‍वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्‍वानाने मंदिरापासून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. त्यानंतर परिसरात घुटमळले. मंदिर परिसरातील सहा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद स्थितीत आहे. 

पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, करवीरचे पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह शहर पोलिस ठाण्यातर्गंत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

सराईत टोळीचे हे कृत्य केले असावे, असा संशय सुरज गुरव यांनी व्यक्त केला. मंदिरातील चोरीच्या घटनेमुळे कात्यायणी पंचक्रोशीत भाविकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.