Sun, Jul 21, 2019 16:36
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सोनेतारणमधील दागिने निघाले खोटे

सोनेतारणमधील दागिने निघाले खोटे

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 04 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सोनेतारण कर्जासाठी बँकेत ठेवलेले दागिने बदलल्याचा दावा खातेदार महिलेने केल्याने बँक अधिकार्‍यांची त्रेधा उडाली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कसबा बावडा शाखेत हा प्रकार घडला. बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सोनाराविरोधात शाहूपुरी पोलिसांत अर्ज दिला असून या प्रकाराची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 एका खातेदार महिलेने नोव्हेंबर 2017 मध्ये तीन जिन्नस गहाण ठेवून 99 हजारांचे सोनेतारण कर्ज घेतले होते. यासाठी तिने बँकेकडे 19 ग्रॅम, 14 ग्रॅम व 7 ग्रॅम वजनाचे दागिने दिले. पंच, सोनार बँक अधिकार्‍यांसमोर दागिने सील करून ठेवण्यात आले होते. 

उर्वरित रक्कम अदा करून कर्ज फेडण्यासाठी खातेदार महिला 31 मे रोजी बँकेत आली होती. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दागिने परत करण्यात आले. यावेळी खातेदार महिलेने बँकेकडे गहाण ठेवलेले दागिने आपले नसल्याचा दावा केला. तसेच दागिने परस्पर बदलल्याचा आरोप केला. शाखाधिकार्‍यांनी याची दखल घेत संबंधित सोनाराला बोलावून घेतले. तसेच दागिन्यांची खातरजमा करण्यासाठी अन्य एका सोनाराला बोलाविण्यात आले. 
सोने तपासले असता सर्व दागिने केवळ खोटे असून 3 ग्रॅमचा मुलामा असल्याचे उघड झाले. यामुळे बँकेच्या अधिकार्‍यांचेही डोळे विस्फारले. खातेदार महिलेने 4 तोळे दागिने ठेवल्याचा दावा केल्याने याची भरपाई कशी होणार, या चिंतेत अधिकारी पडले. सोनेतारण ठेवताना त्याची तपासणी करणार्‍या सोनाराकडेही याचे उत्तर नव्हते. अखेर बँकेच्या वतीने शाहूपुरी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा अर्ज सोनाराविरोधात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

सोनेतारणसाठी ठेवण्यात आलेले दागिने बदलण्यात आले का? दागिने तपासणी योग्यरीत्या झाली नव्हती का? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असून पोलिस याचा तपास करीत आहेत. सोमवारी सोनार, बँकेचे अधिकारी यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. चौकशीनंतरच याबाबत गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.