Thu, May 28, 2020 10:35होमपेज › Kolhapur › ‘ऑलिम्पिक’-अ‍ॅथलेटिक्स निवड चाचणीत २५०० खेळाडूंचा सहभाग

‘ऑलिम्पिक’-अ‍ॅथलेटिक्स निवड चाचणीत २५०० खेळाडूंचा सहभाग

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:42AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन देशासाठी पदक मिळविण्याच्या उद्देशाने आयोजित निवड चाचणीत तब्बल 2500 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील 100, 200 व 400 मीटर धावणे प्रकारासाठी शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यात कोल्हापूरसह सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. 

सन 2020 मध्ये टोकिओ (जपान) येथे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने देशभरातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याच्या उद्देशाने आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयार करण्याच्या उद्देशाने नॅशनल युवा सोसायटी (एन.वाय.सी.एस)  व गेल इंडियन स्पोर्टस् स्टार यांच्या वतीने या टॅलेंट हंटचे आयोजन करण्यात आले होते.  निवड चाचणीची सुरुवात ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई व अरुण डोंगळे यांच्या हस्ते झाली.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदीवडेकर, विवेक मंद्रुपकर, एन.वाय.सी.ए.चे राज्याचे प्रमुख राजेश पांडे, जिल्हा समन्वयक दीपक शिरगावकर, राजेश आढाव, विभागप्रमुख मंगेश बेंडखळे, प्रा. महेश सूर्यवंशी, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे एस.व्ही. सूर्यवंशी, ज्येष्ठ प्रशिक्षक सुभाष पवार, शंकरराव कुलकर्णी विकास पाटील, यांच्यासह प्रशिक्षक-खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अशी असणार निवड प्रकिया...

11 ते 17  वयोगटातील मुला-मुलींतून 100, 200 व 400 मीटर धावणे प्रकारासाठी निवड चाचणी होत आहे. जिल्हास्तरावरून निवडलेल्या मुला-मुलींची निवड बालेवाडी (पुणे) येथे होणार्‍या राज्य निवड चाचणीसाठी होणार आहे. तेथे दोन दिवसांच्या शिबिरासह निवड चाचणी होईल. यातून निवडलेले खेळाडू दिल्ली येथे होणार्‍या अंतिम राष्ट्रीय चाचणीसाठी पात्र ठरतील. येथे आठ दिवसांच्या शिबिरासह निवड चाचणी होणार आहे. यातून अंतिम 8 ते 10 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

या निवडलेल्या खेळाडूंना 2020 च्या ऑलिम्पिकसाठी तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी संयोजकांची असणार आहे. प्रशिक्षकांसाठी मानधन, क्रीडा साहित्य, पोषक आहार, विविध स्पर्धांसाठी होणारा प्रवास खर्च यासह विविध प्रकारच्या सोयी-सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे.