होमपेज › Kolhapur › ऑलिम्पिक ‘अ‍ॅथलेटिक्स’ टॅलेंट हंटचे आयोजन

ऑलिम्पिक ‘अ‍ॅथलेटिक्स’ टॅलेंट हंटचे आयोजन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

2020 मध्ये टोकिओ (जपान) येथे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या द‍ृष्टीने देशभरातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याच्या उद्देशाने आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या द‍ृष्टीने तयार करण्याच्या उद्देशाने अ‍ॅथलेटिक्समधील रनिंग (धावणे) या खेळ प्रकारासाठी टॅलेंट हंटचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल युवा सोसायटी (एन.वाय.सी.एस.) व गेल इंडियन स्पोर्टस् स्टार यांच्या वतीने ही निवड चाचणी होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर शनिवारी (दि. 2 डिसेंबर) सकाळी 9 वाजता, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या निवड चाचणीचे उद्घाटन होणार आहे. कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी असणार्‍या या निवड चाचणीत खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन ‘एनवायसीएस’चे राज्य समन्वयक मंगेश बेंडखळे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा समन्वयक दीपक शिरगावकर, विकास पाटील आदी उपस्थित होते.  

यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून देशातील 110 जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 11 ते 17 वयोगटांतील मुला-मुलींतून 100, 200 व 400 मीटर धावणे प्रकारासाठी निवड चाचणी होणार आहे. जिल्हास्तरावरून निवडलेल्या मुला-मुलींची निवड बालेवाडी (पुणे) येथे होणार्‍या राज्य निवड चाचणीसाठी होणार आहे. तेथे दोन दिवसांच्या शिबिरासह निवड चाचणी होईल. यातून निवडलेले खेळाडू दिल्ली येथे होणार्‍या अंतिम राष्ट्रीय चाचणीसाठी पात्र ठरतील.

येथे आठ दिवसांच्या शिबिरासह निवड चाचणी होणार आहे. यातून अंतिम 8 ते 10 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या निवडलेल्या खेळाडूंना 2020 च्या ऑलिम्पिकसाठी तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी संयोजकांची असणार आहे. प्रशिक्षकांसाठी मानधन, क्रीडा साहित्य, पोषक आहार, विविध स्पर्धांसाठी होणारा प्रवास खर्च यासह विविध प्रकारच्या सोयी-सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढील वेबसाईटशी संपर्क साधावा www.nycsindia/  www.gailindiaspeedstar.org .