Mon, Jul 22, 2019 00:35होमपेज › Kolhapur › मरावे परी अवयवरूपी उरावे!

मरावे परी अवयवरूपी उरावे!

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:27PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देऊन जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला देऊन निगवे खालसा येथील अमर पांडुरंग पाटील यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. काही दिवस अपघातामुळे गंभीर जखमी झालेला अमर बे्रन डेड (मेंदूची मृतावस्था) अवस्थेत गेला होता. या अवस्थेतून तो पुन्हा बरा होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे अमरच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ त्या ऐवजी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा संदेश त्याने समाजाला दिला आहे. सरूड (ता. शाहूवाडी) येथील कमल तुकाराम कांबळे यांनी पहिल्यांदा अवयव दान केले होते. या घटनांवरून जिल्ह्यात अवयवदानासंदर्भात जागृती होत असल्याचे पहायला मिळते.

अमरच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर हृदय, किडनी आणि लिव्हर काढण्यात आले. हृदय मुंबईला तर किडनी व लिव्हर पुण्याला पाठविण्यात आले. जनजागृतीमुळेच जिल्ह्यात अवयवदान चळवळ रुजताना दिसत आहे. राज्यात तेरा हजारहून अधिक रुग्ण विविध प्रकारच्या अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत आहेत.सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगती साधली असून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार करणे सोयीचे झाले आहे. 

अवयवदानांतर्गत ‘लाईव्ह ऑर्गन डोनेशन’द्वारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच कॅडव्हेर मस्तिष्कस्तंभ मृत्यूपश्‍चात किडनी, लिव्हर, लंग्ज, ह्दय, त्वचा हे अवयव दान करता येतात. अवयवदात्यांची प्रतीक्षा लक्षात घेऊन राज्य शासनाने समाजात जागृती व्हावी म्हणून ‘महा अवयवदान’ जनजागृती अभियान सन 2016 मध्ये चांगले राबविले. सध्या ही चळवळ शासकीय पातळीवर कोलमडली आहे, पण समाजात अवयवदान चळवळीला बळ मिळताना दिसते आहे. सरूड (ता. शाहूवाडी ) येथील कमल तुकाराम कांबळे यांचा ब्रेन डेड झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी किडनी, यकृत, डोळे हे अवयव दान केले होते. त्यानंतर शनिवारी निगवे खालसा येथील अमर यांचा ब्रेन डेड झाल्याने पत्नी शीतल आणि वडील पांडुरंग व कुटुंबातील अन्य सदस्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.पाटील कुटुंबीयांच्या या धाडसी निर्णयामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले आहे.