Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Kolhapur ›

‘त्या’ पोलिसांच्या चौकशीचे आदेश

‘त्या’ पोलिसांच्या चौकशीचे आदेश

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 1:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी

 तामगाव, मोरेवाडी येथील दुहेरी खुनातील आरोपींच्या बडदास्त प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. बंदोबस्तासाठी नियुक्त पथकातील चारही पोलिसांच्या वर्तनाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी करवीर पोलिस उपअधीक्षकांना बुधवारी दिल्या आहेत.

दुहेरी खुनातील मारेकर्‍यांची बडदास्त ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यास दोषी अधिकारी, पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यासह पथकातील पोलिसांचीही सकाळी झाडाझडती घेण्यात आल्याचे समजते.

शासकीय रुग्णालय आवारातील कोणत्या हॉटेलमधून मारेकर्‍यांना स्पेशल चहा देण्यात आला. त्यासाठी कोणा अधिकारी, पोलिसाने पुढाकार घेतला. यावेळी मारेकर्‍यांचे नातेवाईक, समर्थक उपस्थित होते का, स्पेशल चहाचे बिल कोणी दिले. पथकातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याकडून मज्जाव करण्यात आला की काय? याच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.

तामगाव व मोरेवाडी येथील दुहेरी खुनातील मुख्य संशयित भैरू ऊर्फ सुनील मोरे, रशीद वजीर, जावेद शेख, सुनील शिंदे, रोहित कांबळे यांना मंगळवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पथकातील काही पोलिसांनी मारेकर्‍यांना स्पेशल चहा पाजल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांच्या या कृत्यावर रुग्णालय आवारातील नागरिक अवाक झाले होते.

मारेकर्‍यांचे लाड कशासाठी?
दोन निष्पापांचे बळी घेणार्‍या मारेकर्‍यांचे एवढे लाड कशासाठी? असा स्पष्ट सवाल करीत रुग्णालय आवारातील उपस्थित संतप्त नागरिकांनी पोलिसांची खरडपट्टी केली होती. तणावपूर्ण स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी मारेकर्‍यांची पोलिस व्हॅनकडे रवानगी केली होती.

अधिकार्‍यांवर प्रश्‍नाचा भडीमार
मारेकर्‍यांच्या बडदास्तप्रकरणी माध्यमांतून जोरदार गाजावाजा झाल्याने पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सकाळी करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे घटनाक्रम तपासणार
या प्रकरणाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी  दिले आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी बंदोबस्तासाठी नियुक्त पथकातील चारही पोलिसांसह व्हॅनचालक, हॉटेल व्यावसायिक, परिसरात उपस्थित नागरिकाकंडे चौकशी सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारेही घटनाक्रम तपासण्यात येणार आहे, असेही गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.

Tags :  kolhapur district, tamgaon marwadi, village double murder case,  police