Mon, Mar 25, 2019 13:24होमपेज › Kolhapur › सावकारांसह साथीदारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा

सावकारांसह साथीदारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शहर व जिल्ह्यातील सावकारी टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी सावकार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले. समाजकंटकाविरुद्ध कठोर भूमिका घेऊन त्याची दादागिरी मोडीत काढा, असेही ते म्हणाले. 

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत अधिकार्‍यांची मंगळवारी सकाळी येथील पोलिस मुख्यालयात बैठक झाली. पोलिसप्रमुख मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, आर. आर. पाटील, डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात गुन्हेगारीला थारा मिळता कामा नये, सराईतावर वचक ठेवण्यासाठी त्यांच्यावर  प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍याविरुद्ध प्रसंगी कठोर कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशाराही पोलिसप्रमुखांनी दिला.

जोतिबा यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशभरातून भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन अधिकारी, पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून मोहिते म्हणाले, जिल्ह्यात गावोगावी यात्रा, उरुसासह अन्य धार्मिक कार्यक्रम होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्‍वर जयंती सोहळा शांततेत साजरा होण्यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. 

सराईत टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी म्होरक्यासह साथीदाराविरुद्ध ‘मोका’, झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक, तडीपारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावेत. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांनी समाजातील सर्वच घटकांना विश्‍वासात घेऊन प्रयत्न करावेत, असेही ते 
म्हणाले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Order of direct ransom, cases, against, lender, associate


  •