Mon, Mar 25, 2019 05:13
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल रेंगाळणार

पर्यायी पूल रेंगाळणार

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत ‘वर्क ऑर्डर’ काढली असली, तरी ती ठेकेदार कंपनीने स्वीकारली नाही. हे बांधकाम पावसाळ्यात करता येणे तांत्रिकद‍ृष्ट्या शक्यच नसल्याचे पत्र कंपनीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे. यामुळे या पुलाचे बांधकाम रेंगाळणार आहे. पावसाळ्यानंतरच या बांधकामाला प्रारंभ होईल, अशीच चिन्हे आहेत.पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे अर्धवट बांधकाम पुरातत्त्व विभागाच्या कायद्यात अडकले आहे. त्यावर पर्याय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या बांधकामाला मंजुरी देण्याबाबत जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, असा आग्रह सर्वपक्षीय कृती समितीने धरला आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याबाबतपरवानगी मिळण्याची शक्यता आहे. ती मिळेपर्यंत पुलाच्या रत्नागिरीकडील बाजूचे काम सुरू करावे आणि परवानगीनंतर मूळ काम सुरू करावे, तशी वर्क ऑर्डर काढावी, अशी मागणी कृती समितीने केली होती. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोमवारी (दि. 14) या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर काढली. मात्र, ती वर्क ऑर्डर कंत्राटदारांनी स्वीकारली नाही. याउलट वर्क ऑर्डरनुसार हे काम पावसाळ्यात करणे शक्यच नसल्याचे पत्रच राष्ट्रीय महामार्ग विभागाला मंगळवारी सायंकाळी ई-मेलद्वारे देण्यात आले.आज कार्यालयात लेखी स्वरूपातील पत्रही देण्यात आले.

बांधकामाला तांत्रिक अडसर

पर्यायी पूल हा व्ही टाईपचा स्लॅब टाकावा लागणारा पूल आहे. याकरिता जागेवरच सेंट्रिंग काम करावे लागणार आहे. त्याकरिता नदीपात्रात तशी जागा तयार करावी लागणार आहे. कॉलम काढण्यापासून ते स्लॅब टाकण्यापर्यंत किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.पुलाच्या बांधकामासाठी जरी परवानगी मिळाली, तरी 15-20 दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. या कालावधीत नदीपात्रात रस्ता करून, त्या ठिकाणी क्रेनसह अन्य साहित्य नेऊन आवश्यक उंचीपर्यंत कॉलम उभे करणेही शक्य नाही. पुलाच्या रत्नागिरीकडील बाजूचे कामही करता येणार नाही. या बाजूचे केवळ चार-पाच दिवसांचे दोन ते अडीच क्यूबिक मीटरचा भराव, डांबरीकरण आणि रेलिंग करणे असे काम शिल्लक आहे. हे काम सुरू केले, तर या बाजूने नदीपात्रात के्रन, डंपरसह अन्य साहित्य नेण्यासाठी केलेला रस्ता बंद होणार आहे. यामुळे पूल पूर्णत्वास आल्यानंतरच या बाजूचे काम करावे लागणार आहे. पावसाळ्यानंतर जरी काम सुरू झाले, तरी दिलेल्या वर्क ऑर्डरची सहा महिन्यांची मुदत संपण्याची शक्यता आहे. याच दरम्यान बांधकामाची ‘डीआरसी’ (दर) बदलत असते, त्यामुळे वाढीव दराचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याने बांधकाम रखडण्याचीच भीती आहे.

पावसाळ्यानंतर तीन महिन्यांत पूल पूर्ण करू

या पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी मागवलेल्या पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दुसर्‍या निविदा 9 मे 2017 रोजी उघडण्यात आल्या. 12 मे रोजी गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. मात्र, 29 नोव्हेंबर 2017 ला कंपनीला तसे कळवत 15 लाख रुपयांची बँक गॅरंटी देण्यास सांगण्यात आले. कंपनीने 30 नोव्हेंबर रोजी बँक गॅरंटी दिली. त्यानंतर आज मंजुरी मिळेल, उद्या मंजुरी मिळेल, असे सांगण्यात येत होेते. अखेर 31 मार्चपर्यंत वाट पाहिल्यानंतर बँक गॅरंटी परत देण्याची मागणी केली, त्यालाही प्रशासनाने उत्तर दिलेले नाही. मुळातच टेंडर दिल्यानंतर त्याचा 90 दिवसांचा करार असतो. तो संपला असून, वर्ष उलटत आले तरीही आम्ही वाट पाहत आहोत. आता परवानगी मिळाली, तरीही बांधकाम करू शकत नाही. मात्र, पावसाळ्यानंतर तीन महिन्यांत पूल वाहतुकीसाठी खुला करू, असे कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी सांगितले.

शिवाजी पुलाची दुरुस्ती, देखभाल गरजेची

सध्याच्या शिवाजी पुलाची दुरुस्ती आणि योग्य देखभाल करणे गरजेचे आहे. पर्यायी पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे, यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतुकीसाठी शिवाजी पूल हाच पर्याय राहणार असल्याने त्यावरील वाहतूक पावसाच्या कालावधीत अधिक सुरळीत कशी ठेवता येईल, या द‍ृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे.