Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Kolhapur › विरोधकांनी एकत्र यावे : पवार

विरोधकांनी एकत्र यावे : पवार

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 2:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

संसदीय लोकशाहीला न शोभणारे करणार्‍यांच्या हातात देशाची सत्ता आहे. हे देशाच्या हिताचे नाही, यामुळे विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले. लोकांनाही विरोधक एकत्र हवे आहेत, हे उत्तर प्रदेशसह अन्य पोटनिवडणुकांतून स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.पवार म्हणाले, देशाचे चित्र बदलत चालले आहे. विरोधकांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे; पण आम्ही सर्व एकत्र राहू की नाही, याबाबत लोकांना काळजीही वाटत आहे. यामुळे सर्व विरोधक एकत्र करण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्या राज्यात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्याच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांनी लढावे, अशी आपली सूचना आहे. काँग्रेस आणि आम्ही एकत्रितच लढणार असून, भाजपला त्याचा फायदा होणार नाही याची काळजी घेऊ, असेही पवार यांनी सांगितले. 

राजकारणात विरोधक असतात, शत्रू नाही. मात्र, सत्ताधारी राजकारणात आमचा अमुक एक पहिल्या क्रमांकाचा शत्रू म्हणून सांगत असतात. साप, विंचू अशा उपमा देत असतात. संसदीय लोकशाहीत हे शोभणारे नाही, विरोधक म्हणजे शत्रू, अशी ज्यांची मानसिकता आहे अशांच्या हातात देश दिला, तर ते जनतेच्या हिताचे नाही. सध्याच्या सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे का, यावर पवार म्हणाले, या देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय घेतला, त्यावेळी आम्ही त्यांच्या सोबत होतो. आम्हाला वाटले चांगले होईल; पण लोकांनी ते मान्य केले नाही, इंदिरा गांधींचाही पराभव झाला. या देशात लोकशाही टिकली ती सामान्य माणसांमुळे; त्या बाहेर कोणी जाईल, हे लोकांना पटणार नाही. 

निवडणुकांच्या आघाडीबाबत निर्णय होईल. पक्षाचे 10 जूनला संमेलन होणार आहे. त्यात निर्णय घेतला जाईल. राहुल गांधी यांच्या बरोबर निवडणुकीत काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी आपली भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चाही झाली आहे. ते एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत, ते मान्यही करावे लागेल, असेही पवार यांनी सांगितले.सरन्यायाधीशांवर अपुरे संख्याबळ असतानाही महाभियोग आणण्याचा प्रयत्न होत आहे, याबाबत पवार म्हणाले, सरकारचे धोरण जनतेच्या हिताचे नाही असे वाटले की, सरकारवरही अविश्‍वास आणला जातो. त्यामुळे चर्चा होते, मते मांडता येतात. हा ठराव आणला गेला हे जनतेलाही आणि सरकारलाही कळते, त्यातून सरकारची भूमिका लोकांनाही कळते, असे सांगत यानिमित्ताने चर्चा होईल, मते मांडता येतील.

खासदार राजू शेट्टी सोबत आले आहेत, याबाबत पवार म्हणाले, शेतकर्‍यांच्या हिताचे राजकारण जे करतात, त्याला आपली साथ आहे. येत्या 25 तारखेला दिल्लीत शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या संघटनांची बैठक आहे, त्याला आपणही उपस्थित राहणार आहोत. आपण आणि साखर कारखानदार सरकारला वठणीवर आणू, असे शेट्टी यांनी वक्तव्य केले आहे, याबाबत पवार यांनी ते आता गुणात्मक बोलले, असे सांगत त्यांचाही चिमटा काढला.यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर, अनिल साळोखे, रामराजे कुपेकर, अनिल कदम, अनिल घाटगे, जयकुमार शिंदे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Opposition, should, come, together, said, Pawar