Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Kolhapur › महागाईविरोधात विरोधी पक्षांचा एल्गार

महागाईविरोधात विरोधी पक्षांचा एल्गार

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:42PMइचलकरंजी : प्रतिनिधी

वाढत्या महागाईला आळा घालावा, पेट्रोल-डिझेल, गॅसची दरवाढ रोखावी, यंत्रमागाला सर्व करासहीत प्रतियुनिट 2 रुपये प्रमाणे वीज देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज येथील सर्व विरोधी पक्षीय कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रताप होगाडे आदींनी केले. यावेळी प्रांतांना निवेदन सादर करण्यात आले. 

महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी प्रांत कार्यालयावर धडक मारली. खा. शेट्टी म्हणाले, सत्ताधारी भाजपने राजकारणाचा धंदा केला असून जनतेचा विश्‍वासघात केला आहे. याचा बदला आपण मतपेटीतून घेऊ. अजूनही वेळ गेलेली नाही. येत्या वर्षभरात गोरगरिबांच्या कल्याणाचे निर्णय सरकारने घ्यावेत. माजी मंत्री आवाडे म्हणाले, इचलकरंजीतील सरकारी दवाखान्याचे वाटोळे झाले. वस्त्रोद्योगाची अवस्था बिकट आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचे पैसे आमदारांनी सरकारला परत पाठवून दिले असून यांना इचलकरंजीच्या व्यवसायाची काळजी नाही. हे सरकार घालवण्यासाठी जनतेत चिड निर्माण झाली असून सर्वजण एकत्र लढल्यास भाजप शिल्लकही राहणार नाही. 

निवेदनात म्हटले आहे की, ‘अच्छे दिन’ चा दावा करून केंद्रात सत्ता मिळवलेल्या मोदी सरकारला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, सर्वसामान्य माणसांचे जीवन अधिकाधिक मुश्कील बनत चालले आहे. पेट्रोलची दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांची क्रूर चेष्टा केली आहे. पेट्रोल व डिझेल चढ्या भावानेच विकले जात असून यातून मिळणारा प्रतिलिटर अंदाजे 40 रुपयांचा नफा कोणाच्या खिशात जात आहे, असा सवाल यावेळी करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. हा उद्योग शासनाच्या मदतीशिवाय तरणार नाही.

त्यामुळे सर्व यंत्रमागधारकांना सर्व करासहीत 2 रुपये प्रतियुनिट याप्रमाणे वीज देण्यात यावी, मजुरीने कापड विणणार्‍या यंत्रमागधारकांना यंत्रमाग महामंडळामार्फत रास्त मजुरीत बिमांचा पुरवठा करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. शहरातील 63 हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना गेल्या 4 वर्षांपासून तांदूळ व गहू मिळालेला नाही. त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे रेशनकार्डधारकांना पूर्वीप्रमाणे 35 किलो धान्य देण्यात यावे, संजय गांधी निराधार योजना, अंध, अपंग, कुष्ठरोगी तसेच शासनाच्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेतील लाभार्थ्यांनाही अन्‍नसुरक्षा योजनेतून लाभ देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सर्व विरोधी पक्षीय कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

मोर्चात मिश्रीलाल जाजू, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, शिवानंद पाटील, सयाजी चव्हाण, महादेव गौड, प्रकाश पाटील आदींसह राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसेवा पार्टी, माकप, भाकप, मनसे, सर्व श्रमिक संघ, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन महासंघ, जनता दल, राष्ट्रवादी कामगार संघटना आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.