होमपेज › Kolhapur › सीईटीपी प्रकल्पास इचलकरंजीत विरोध

सीईटीपी प्रकल्पास इचलकरंजीत विरोध

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:56PMइचलकरंजी : वार्ताहर

भुयारी गटार योजनेसाठी आवश्यक 18 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या कामास टाकवडेवेस परिसरातील नागरिकांचा विरोध कायम आहे. नागरिकांच्या विरोधाची धार वाढतच चालली असून, हा प्रकल्प रद्द करावा, यासाठी भागातील महिलांसह नागरिकांनी खासदार राजू शेट्टी यांनाही साकडे घातले आहे. त्यामुळे वादग्रस्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत मार्ग काढण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 

जुना चंदूर रोड परिसरात हा प्रकल्प उभारण्याचे पालिकेने ठरवले होते. मात्र, जुना चंदूर रोड परिसरातील प्रकल्प सोयीस्कर होणार नसल्याने ते ठिकाण बदलण्यात आले. अनेक जागांच्या चाचपणीनंतर पालिकेने टाकवडेवेस परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित केले आहे. याच परिसरातून काळा ओढा वाहत असून, त्यावरही मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प पालिकेकडून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे होणार्‍या त्रासातून भागातील नागरिकांची सुटका झाली नसताना, पुन्हा नव्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने नागरिकांनी त्याला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची जागा नागरी वस्तीलगत असून, या ठिकाणी दाट लोकवस्तीही आहे.

त्यातच ही जागा एका समाजाच्या स्मशानभूमीसाठीही देण्यात आली आहे. आधीच प्रदूषणामुळे भागातील नागरिक त्रस्त असताना, पुन्हा या प्रक्रिया प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा विरोध वाढतच चालला आहे. 

भागातील महिला व नागरिकांनी यापूर्वी पालिकेला निवेदन सादर करून विरोध दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर खा. शेट्टी यांनाही नागरिकांनी नुकतेच निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. आधीच वादग्रस्त बनलेल्या भुयारी गटार योजनेच्या पूर्णत्वासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. हा प्रकल्प उभारला न गेल्यास भुयारी गटार योजनाही पूर्ण होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम रखडले आहे. हे काम सुरू करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. त्यातच प्रकल्प उभारण्याच्या कामाकडेही पालिकेचा कानाडोळा असून, नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे यातून मार्ग कसा काढणार, याकडे लक्ष लागले आहे. 

जागेसाठी पालिकेची कसरत

इचलकरंजी शहरातील वाढीव शहापूर व कबनूर आदी वसाहतींमधील सांडपाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 92 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना शहरात राबवण्यात येत आहे. या योजनेचे काम अवघे 55 टक्केच पूर्ण झाले असून, सध्या योजनेचे काम रखडले आहे. त्यातच या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आवश्यक आहे. भुयारी गटार योजनेतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 18 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प उभारण्याचा प्रश्‍नही वादग्रस्त बनला आहे. प्रकल्पासाठी जागा मिळवण्यासाठी पालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे.