Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Kolhapur › मराठा समाज आरक्षणाचा प्रश्‍न भाजप सरकार सोडविणार

मराठा समाज आरक्षणाचा प्रश्‍न भाजप सरकार सोडविणार

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय मराठा समाजाला आरक्षण अशक्य आहे. हा अहवाल लवकर देण्यासाठी सरकार बांधिल आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू. हे काम आमचेच सरकार करणार, असा ठाम विश्‍वास महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील कोल्हापुरात उभारलेल्या पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजातील तरुण-तरुणींना विविध व्यवसाय उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जास शासनाने हमी दिली आहे. या कर्जाचे व्याज शासनामार्फत भरले जाणार असल्याने  तरुणांना बँकांमार्फत तत्काळ कर्ज उपलब्ध होणार आहे. बारा हजार तरुणांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज भरले असून त्यापैकी पाचशे तरुणांना कर्ज उपलब्ध झाले आहे. उर्वरित तरुणांना लवकरच बँका कर्ज उपलब्ध करून देतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील पहिले सर्व सोयी-सुविधा असलेले वसतिगृह कोल्हापुरात उभारण्यात आले आहे. 72 विद्यार्थ्यांची मोफत सोय झाली असून, ही व्यवस्था 100 विद्यार्थ्यांपर्यंत वाढविली जाणार आहे. आगामी काळात कोल्हापुरात मुलींसाठीही स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा मानस आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी भरून प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सर्व संस्था चालकांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कसलीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. 

वसतिगृहामध्ये राहण्यासाठी आलेल्या पाच विद्यार्थ्यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रूमच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी आमदार अमल महाडिक, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, विरोधी पक्ष नेता विलास वास्कर, उपअभियंता धनंजय भोसले, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्यासह ताराराणी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. 

कोल्हापुरातील मराठा समाजातील उभारण्यात आलेल्या वसतिगृहासाठी महाडिक उद्योग समूहातर्फे 2 लाख 51 हजार रुपये देण्याची घोषणा आ. अमल महाडिक यांनी केली. जनतेनेही वसतिगृहासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

महिनाभरात दहा जिल्ह्यात नवीन वसतिगृह
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिन्याभरात राज्यातील दहा जिल्ह्यांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत. येत्या आठवडाभरात पुणे येथे मुलींचे वसतिगृह सुरू होत असून महिन्याभरात मुलांचेही वसतिगृह सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

उद्घाटनप्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले; परंतु मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर विचारे माळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वसतिगृह परिसरास पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.