Sun, May 26, 2019 18:46होमपेज › Kolhapur › एस.टी., केएमटीसाठी शिवाजी पूल खुला

एस.टी., केएमटीसाठी शिवाजी पूल खुला

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवारीही पावसाने उघडीप दिली. तब्बल 14 दिवसांनंतर पंचगंगा नदी पात्रात गेली. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणी पातळीतही घट होत आहे. दरम्यान, शिवाजी पूल मोठ्या वाहनांसाठीही खुला करण्यात आला. त्यावरून एस.टी., केएमटी  वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

शहरासह जिल्ह्यात आजही पावसाने विश्रांती घेतली. शहरात काही काळ ऊनही पडले होते. अधूनमधून कोसळणारी एखादी सर वगळता दिवसभर पावसाची उघडीपच होती. जिल्ह्यातील आणखी 23 बंधार्‍यांवरील पाणी उतरले. वारणेवरील दोन, कासारीवरील पाच, ताम्रपर्णीवरील चार, घटप्रभेवरील तीन, वेदगंगेवरील चार, तर कुंभी, हिरण्यकेशी, तुळशी व भोगावती नदीवरील प्रत्येकी एक बंधारा खुला झाला. त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान, अद्याप 24 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगेवरील सात, वेदगंगा व दूधगंगेवरील प्रत्येकी सहा, भोगावतीवरील चार, वारणेवरील तीन, तर कासारीवरील एका बंधार्‍यावर अद्याप पाणी असल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू आहे. पंचगंगेची पातळी रात्री 31.4 फुटांपर्यंत कमी झाली आहे. पंचगंगेचे पाणी पात्रात गेल्याने घाट परिसरात आज महापालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 12.43 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक 28.50 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 25.67  मि.मी., शाहूवाडीत 21.23 मि.मी., आजर्‍यात 17.25 मि.मी., चंदगडमध्ये 13.16 मि.मी., भुदरगडमध्ये 12.60 मि.मी., पन्हाळ्यात 10 मि.मी., कागलमध्ये 9.14 मि.मी., करवीर, गडहिंग्लजमध्ये 4 मि.मी., हातकणंगलेत 1.75 मि.मी., तर शिरोळमध्ये 1.75 मि.मी. पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रांतीलही पावसाचा जोर कमी झाला आहे. राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी झाली. तिथे 80 मि.मी. पावसाची नोंद झाली. अन्य धरण परिसरात मात्र पावसाचा जोर नव्हता. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुलाच असून, धरणातून 3 हजार28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातून 8 हजार क्युसेक विसर्ग सुरूच आहे. वारणेतील विसर्ग 6 हजार463 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. पाटगाव आणि चिकोत्रा वगळता अन्य सर्व धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.