Sun, May 26, 2019 00:55होमपेज › Kolhapur › शिक्षणमंत्र्यांची बंद खोलीत खुली चर्चा

शिक्षणमंत्र्यांची बंद खोलीत खुली चर्चा

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शाळा बंद धोरणाबाबत एकमेकांना खुल्या चर्चेचे आव्हान देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण वाचवा नागरी कृती समिती पदाधिकारी शनिवारी अखेर आमने-सामने आले. बिंदू चौकातील खुल्या चर्चेऐवजी रेसिडेन्सी क्लब येथील बंद खोलीतील चर्चेची दिवसभर शिक्षण वर्तृळात चर्चा रंगली होती. 

शासनाच्या सरकारी शाळा बंद व खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जनआंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कृती समितीला बिंदू चौकात चर्चेसाठी येण्याचे खुले आव्हान दिले होते. मागील आठवड्यात कृती समितीने बिंदू चौकात शिक्षणमंत्री वाट पाहण्याचे अनोखे आंदोलनही केले. मात्र, मंत्री विनोद तावडे आलेच नाहीत.

या पार्श्‍वभूमीवर मंत्री विनोद तावडे शनिवारी (दि.8) कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. रेसिडेन्सी क्लबमध्ये मंत्री तावडे, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व शिक्षण विभागाचे अधिकारी व  शिक्षण वाचवा समितीचे पदाधिकारी यांची बंद खोलीत दोन तास चर्चा झाली. कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार यांनी प्रास्ताविकात आंदोलनामागील भूमिका मांडली. प्रा. एन. डी. पाटील यांनी शाळा बंद धोरण, शिक्षणावरील खर्च, खासगी कंपनी शाळा विधेयक हे मुद्दे मांडले. गिरीश फोंडे यांनी बंद करण्यात येणार्‍या गावातील शाळांच्या भेटीचा वृत्तांत आकडेवारी सांगत इतर राज्यांतील उदाहरणे दिली. कृती समितीच्या एका पदाधिकार्‍याने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात स्वयंअर्थसहाय्यित शाळा धोरण व कंपनी अ‍ॅक्टला विधेयकाला विरोध केला. स्वयंअर्थसहाय्यित शाळा धोरण रद्द का करत नाही, अशी विचारणा केली. यावर मंत्री तावडे यांनी हे धोरण रद्द करण्याबाबत अडचणी असल्याचे सांगितले. 

अशोक पोवार यांनी विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या वेळेनंतर रस्त्यावर एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हणणे गुन्हा ठरतो का? असा सवाल केला. 1 मे रोजी ध्वजारोहण व पोलिस कवायतीवेळी शालेय मुलांना नेले जाते. याबाबत परवानगी घेतली जात नाही. यावर मंत्री तावडे यांनी कोणीच मुलांना रस्त्यावर आणणे योग्य नाही. शासन शिक्षण वाचवा जनआंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाधिकार कायदा शताब्दीचा शासनाला विसर पडला आहे. यावर प्रश्‍नावर मंत्री तावडे निरुत्तर झाल्याचे समजते.  

कोल्हापुरात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत गृहविभागास भावना कळवितो, असे तावडे यांनी यावेळी सांगितले. तसेच नवीन निर्णय जाहीर केले. यामुळे आंदोलनास यश आल्याची भावना कृती समिती पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. यावेळी आ. अमल महाडिक, प्रभाकर आरडे, प्राचार्य टी. एस. पाटील, रमेश मोरे, भरत रसाळे, एस. डी. लाड, सुभाष देसाई, गणी आजरेकर, संतोष आयरे आदी उपस्थित होते.