Fri, May 24, 2019 06:43होमपेज › Kolhapur › खेळाडूंसह शाळांची होणार ऑनलाईन नोंदणी

खेळाडूंसह शाळांची होणार ऑनलाईन नोंदणी

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:20PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापूरला लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्यापासूनची शतकी परंपरा आहे. ही परंपरा जपण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. खेळाडूंना केंद्रस्थानी मानून सर्व निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार व जि.प. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांची भेट देऊन आगामी शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाबाबत माहिती सांगितली. 

सन 2018-19 च्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठीची विशेष तयारी म्हणून शाळांसह खेळाडूंची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रकिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येईल. स्पर्धेतील ‘बोगस’ खेळाडू किंवा नियमबाह्य प्रकारे वयोगटाबाहेरील खेळाडू खेळविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक खेळाडूंना युनिक आयडी क्रमांक देण्यात येणार आहे. खेळाडूची इत्थंभूत माहिती संकलित होणार आहे. यात त्याची जन्मत तारीख, पत्ता, ब्लड ग्रुप, शाळा, खेळ प्रकार, त्यातील कामगिरी अशी इत्थंभूत माहितीचा समावेश असणार आहे. जेणेकरून ही माहिती लागेल त्यावेळी एका क्‍लिकवर उपलब्ध होईल. 

शालेय स्पर्धांना नेटके नियोजन

यंदाच्या शालेय स्पर्धेचे नेटके नियोजन केले जाईल. विभागीय क्रीडा संकुलावर पाण्याच्या व्यवस्थेसाठी हौद बांधण्याची मंजुरी मिळाली आहे. हा हौद होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. स्पर्धेच्या ठिकाणी प्राथमिक उपचाराचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. कोल्हापूरसह आसपासच्या पाच जिल्ह्यांसाठी असणार्‍या विभागीय क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जाईल, असेही साखरे यांनी सांगितले.