Fri, May 24, 2019 06:28होमपेज › Kolhapur › दूध अनुदानात ऑनलाईनचा अडथळा

दूध अनुदानात ऑनलाईनचा अडथळा

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 1:06AMकोल्हापूर : निवास चौगले

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करताना शासनाने काढलेल्या अध्यादेशात जे संघ दूध खरेदीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने उत्पादकाला आदा करण्याची अट या निर्णयाच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. अपवाद सोडला, तर बहुंताश संघांकडून दूध खरेदीचे पैसे हे रोख स्वरूपातच दिले जातात. शासनाचे अनुदान केवळ तीन महिन्यांसाठीच असल्याने एवढ्या कमी कालावधीत ऑनलाईन पैसे देण्याची यंत्रणाही उभी करणे अशक्य आहे. त्यामुळे या आदेशाची स्थितीही कर्जमाफीसारखीच होण्याची शक्यता आहे. 

गाईच्या दुधापासून तयार होणार्‍या पावडरचे दर कोसळल्याने राज्यातील दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात मोठी कपात केली. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन केले. चार दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने संघांना गाईचे दूध प्रतिलिटर 25 रुपये दराने खरेदी करण्याचे आदेश काढले. या बदल्यात पिशवीबंद सोडून उर्वरित दुधाला संघांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. निर्यात दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान मिळणार आहे; पण यासंदर्भातील आदेश काढताना संघांनी उत्पादकांना ऑनलाईन पद्धतीनेच पैसे देण्याची अट घालून या आदेशात मेख मारली आहे. 

ऑनलाईन बिल देण्यात अडचणी अधिक
राज्यात गोकुळसह बहुंताश संघांकडून रोख स्वरूपातच दूध खरेदीचे पैसे दिले जातात. संघांमार्फत प्राथमिक दूध संस्थांना पैसे दिलेे जातात, तेथून उत्पादकांपर्यंत रोखीने हे पैसे पोहोच केले जातात. ‘गोकुळ’ने सुमारे 50 टक्के संस्थांचे हे बिल ऑनलाईन देण्याची सुविधा सुरू केली; पण त्यातही अडचणीच जास्त आहेत. अपवाद सोडला, तर कोणीही ही यंत्रणा उभारलेली नाही. शासन हे अनुदान फक्त तीन महिन्यांसाठीच देणार आहे. एवढ्या कमी कालावधीत ऑनलाईन यंत्रणा उभी करणेही संघांना शक्य नाही. त्यामुळे अनुदानाचा निर्णय झाला असला, तरी ते प्रत्यक्षात मिळण्यात ही ऑनलाईन पद्धतच अडथळा ठरणार आहे.