Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Kolhapur › ‘ऑनलाईन’च्या  स्वतंत्र यंत्रणेचे ‘गाजर’च!

‘ऑनलाईन’च्या  स्वतंत्र यंत्रणेचे ‘गाजर’च!

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 11:40PMनानीबाई चिखली : भाऊसाहेब सकट  

गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाने शाळांची अनेक प्रकारची माहिती ऑनलाईन करण्याबाबत सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी कोणतीही सुविधा किंवा स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आलेली नाही. त्यामुळे दैनंदिन अध्यापन कामाव्यतिरिक्त या कामाचा अतिरिक्त ताण सर्व शिक्षकांवर पडत असल्यामुळे वेळ, पैसा यांचा अपव्यय होत आहे. म्हणून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षकांवर होणार्‍या अन्यायाबाबत न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा नव्याने आक्रमक होण्याचे ठरवले आहे.

विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या योजना, पोषण आहार यासह अनेक प्रकारची माहिती ऑनलाईन करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना वेठीस धरण्यात येते. त्यामुळे ऑनलाईन कामावर बहिष्कार असल्याबाबत यापूर्वीच प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक स्तरावर धरणे आंदोलने ही  केलेले आहेत. ऑनलाईन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यामार्फत ही सर्व कामे करून घेण्यात यावी, अशी संघटनांची ठाम मागणी ओरोस येथे झालेल्या शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आली होती. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र यंत्रणा देण्याचे आश्‍वासन ही  दिले होते. 

पण दोन महिने झाले तरी  ऑनलाईन कामे करण्यासाठी कोणतीही कार्यवाही शासनाकडून झालेली नसल्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत असून ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार संघटनांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. यापूर्वी  तालुका स्तरावर देखील समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामसेवक संघटनेप्रमाणे  प्रशासनाकडून येणारे कोणतेही व्हॉटस् अ‍ॅप मेसेज स्वीकारू नयेत.

तसेच केंद्रप्रमुख, बीट, तालुकास्तर आदी सर्व प्रकारच्या प्रशासकीय ग्रुपमधून शिक्षकांनी बाहेर पडावे किंवा येणार्‍या मेसेजना ब्लॉक करून व्हॉटस् अ‍ॅपला प्रतिबंध करावा, असे आवाहन संघटनांच्या वतीने केले जात आहे.

अध्ययन-अध्यापन कार्यापेक्षा अवांतर कामांत शिक्षकांना गुंतवून ठेवणे, दररोज अतार्किक आणि अनाकलनीय शासनादेश काढून मानसिकता खराब करणे आणि वारंवार गुणवत्ता विकसनाच्या तथाकथित र्‍हासाला शिक्षकाला जबाबदार धरणे आदी गोष्टींमुळे शिक्षकवर्ग हैराण झाला आहे. अशातच कमी पटाच्या शाळा बंद करण्यासारखे अघोरी उपद्रव सुरू  
आहेत.  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळा बंद करून कार्पोरेट शाळांना परवानगी देणे व यासह इतर अनेक विषयांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने  शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी बुधवारी दि. 7 मार्चला 11 ते 2 पर्यंत मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन ही आयोजित करण्यात आले आहे.