Thu, Jul 18, 2019 02:56होमपेज › Kolhapur › ऑनलाईन कॅसिनोची विषवल्‍ली

ऑनलाईन कॅसिनोची विषवल्‍ली

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:16PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी 

ऑनलाईन कॅसिनोमधून कोट्यवधी रुपयांची बरकत असल्याने मटका व्यवसायातील बड्या धेंडांनी ऑनलाईन व्यवसायात हात-पाय रोवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही ऑनलाईन कॅसिनोचा बाजार मांडण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात तीन कंपन्यांचाच बोलबाला असून, या कंपन्यांनी महाराष्ट्रभर एजंटांच्या माध्यमातून व्यवसायाचे जाळे विणले आहे. त्यापैकी दोन कंपन्यांचे सूत्रधार इचलकरंजीचे असून, यात ‘अग्र’स्थानी असलेल्या एका कंपनीने वाशी, पनवेलपर्यंत धडक मारत कमाईचा कळस गाठला आहे.

भारत वगळता जगभर कॅसिनोला मान्यता आहे. भारतात फक्‍त गोव्यात कॅसिनोला मान्यता आहे. भारतात कॅसिनोला बंदी असली, तरी ऑनलाईन कॅसिनो उपलब्ध करून देणार्‍या कित्येक वेबसाईटस् आहेत. याच धर्तीवर इचलकरंजीतील मटका व्यवसायातील धेंडांनी कमी पैशांची बेटिंगची सोय असलेली वेबसाईट तयार करून जुगार्‍यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा फंडा अवलंबला आहे. 

महाराष्ट्रात ऑनलाईन कॅसिनो व्यवसायात तीन कंपन्यांचा बोलबाला आहे. त्यापैकी दोन कंपन्यांची पाळेमुळे इचलकरंजीतून सर्वत्र पसरली आहेत. मटक्याच्या व्यवसायात ‘अग्र’स्थानी असलेल्या एकाने या व्यवसायात मोठी झेप घेण्याची मनीषा बाळगत एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीने वाशी, पनवेल, मुंबईपर्यंत झेप घेतली आहे. या कंपनीने गोव्यातही त्याचे जाळे विणल्याने या कंपनीच्या उलाढालीचा अंदाज येऊ शकतो. या कंपनीच्या  वेबसाईटवर किमान दोन रुपये बेटिंग लावण्याची सोय आहे. एका नंबरवर दोन रुपये लावल्यास आणि तो लकी ठरल्यास त्याला 70 रुपयांचे विन दिले जाते. एका नंबरवर जास्तीत जास्त पाच हजार रुपये लावता येतात. त्यामुळे एका खेळात त्याला अंदाजे पावणेदोन लाखापर्यंत रक्‍कम मिळू शकते. 

वरकरणी हा जुगार सोपा वाटत असला, तरी जुगारचालकांनी संगणकीय क्‍लृप्‍ती वापरून जुगार्‍यांना लुटण्याचा फंडा अवलंबल्याने अनेक जुगारी या ऑनलाईन जुगारात भिकेकंगाल झाले आहेत, तर मालकांची कोटींची उड्डाणे घेण्याची मनीषा पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता इतर व्यवसायात हात-पाय पसरून दोन नंबरचा पैसा एक नंबर करण्याचा फंडा अवलंबला आहे. 

इचलकरंजीत क्‍लब व्यवसायात नाव बदनाम झालेल्या एकानेही भागीदारीत या व्यवसायात पाय रोवले आहेत. त्यानेही अमाप माया या व्यवसायातून जमा केली असून, त्याच्या कंपनीचे सॉफ्टवेअर स्पर्धक कंपनीशी मिळतेजुळतेच आहे. ऑनलाईन गेम अशा गोंडस नावाखाली हा जुगार मांडण्यात आला आहे. पोलिसांनाही त्यातील उलाढालीचा अंदाज अद्यापपर्यंत आलेला नाही. एका दुकानासाठी काही हजारांत एन्ट्री घेऊन या अवैध व्यवसायाला  परवानगी देण्यात येत आहे; पण या व्यवसायातून जुगार्‍यांची लाखो रुपयांना लूट सुरू असून, चिरीमिरीच्या लालसेने या विषवल्लीला खतपाणी घालण्यात येत आहे.