Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Kolhapur › ऑनलाईन कॅसिनो : सायबर क्राईमखाली गुन्हे

ऑनलाईन कॅसिनो : सायबर क्राईमखाली गुन्हे

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 07 2018 11:30PMइचलकरंजी : प्रतिनिधी 

काही लाख रुपयांची गुंतवणूक करून ऑनलाईन कॅसिनोचे सॉफ्टवेअर विकसित करायचे आणि गल्लीबोळात जुगार मांडून दररोज कोट्यवधीची कमाई करायची, असा उद्योग काही अवैध धंदेवाल्यांनी चालवला आहेे. त्यांची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू असून येत्या काही दिवसांत ऑनलाईन कॅसिनोप्रकरणी सायबर क्राईमखाली गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना दिला.

इचलकरंजीत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या पथकाने रिंग रोडवरील ऑनलाईन कॅसिनो जुगारावर धाड टाकून चालकास अटक केली तर लाखो रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. ऑनलाईन जुगार चालवणारी ही कंपनी विनलकी असून या कंपनीचे मालक व चालक लकी ठरल्याचे विशेष वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. या ऑनलाईन जुगाराने अनेक गोरगरीब कुटुंबांची वाताहत झाली असून काहींनी कर्जबाजारी होऊन आत्महत्याही केल्याच्या घटना घडल्याबाबत या वृत्तात प्रकाशझोत टाकण्यात आला होता. 

विनलकीचा मालक मंगेश नामक असून तो कोल्हापुरातील असल्याची माहितीही पोलिस तपासात पुढे येत आहे. याशिवाय इचलकरंजी व परिसरात या कंपनीचा जुगार चालवणार्‍या चालकांची माहितीही पोलिस घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारचे सॉफ्टवेअर तयार करून देणार्‍या कोणत्या कंपन्या व तज्ज्ञ आहेत, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ज्या विनलकी कंपनीने वेबसाईटद्वारे व अँड्रॉईड अ‍ॅपद्वारे हा जुगार चालवला आहे, त्या कंपनीच्या चालक-मालकावर सायबर क्राईमखाली गुन्हे नोंद करण्यात येणार असल्याची माहितीही श्रीनिवास घाडगे यांनी दिली. 

ऑनलाईन कॅसिनो जुगारावर आतापर्यंत अनेकवेळा धाडी टाकण्यात आल्या. परंतु, हा ऑनलाईन जुगार काही केल्या बंद झाला नाही. याबाबत विचारले असता, श्रीनिवास घाडगे यांनी हा ऑनलाईन जुगार कायमस्वरूपी बंद व्हावा, यासाठी सायबर क्राईम कायद्यांतर्गत गुन्हे  नोंदवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा दिला. ऑनलाईन कॅसिनो जुगार चालवणार्‍या मालक व सॉफ्टवेअर विकसकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन कॅसिनो जुगाराला स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांचे व कलेक्टरांचे पाठबळ आहे. श्रीनिवास घाडगे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऑनलाईन कॅसिनोची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना कलेक्टरांनी दिल्या आहेत.  गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाईन कॅसिनोची दुकाने कुलूपबंद आहेत. परंतू कारवाईचे गांभीर्य संपल्यानंतर काही दिवसांतच ऑनलाईन कॅसिनो जुगार पुन्हा  सुरू होत असल्याचा पूर्व इतिहास आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ज्या भागात अशा पध्दतीचा जुगार सुरू आहे त्याची माहिती थेट पोलिसांना द्यावी, पोलिस कारवाई करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.