Tue, Jul 16, 2019 11:50होमपेज › Kolhapur › कांदा भडकला

कांदा भडकला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कांद्याच्या घाऊक दरात गेले काही दिवस वाढच होत आहे. शनिवारी कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीत झालेल्या सौद्यात कांद्याला प्रतिक्विंटल 5 हजार 300 रुपयांचा दर प्राप्त झाला. यामुळे कांद्याचे दर आणखी वाढणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कांदा बाजारात आला नव्हता. त्यामुळे दरवाढ झाली होती. पाऊस थांबल्यानंतर दर काही प्रमाणात उतरले होते. गत आठवड्यात (10 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत) किमान 1 हजार रुपये ते 4 हजार 200 रुपये असा प्रतिक्विंटलचा दर होता. गत आठवड्यात 2 हजार 630 रुपयांपर्यंत कांद्याचा सरासरी दर होता. शनिवारी कांद्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. शनिवारी 9470 पोती कांद्याची आवक झाली. किमान 1 हजार 200 ते 5 हजार 300 प्रतिक्विंटलला दर मिळाला. यामुळे सरासरी दर 3 हजार 200 रुपये असा राहिला आहे. 

बाजार समितीत कांद्याचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत गेल्या पाच वर्षांत कांद्याची उलाढाल वाढली आहे. नाशिक, अहमदनगर, पुरंदर, जुन्‍नर, लोणंद, पंढरपूर या परिसरातून कांदा विक्रीसाठी येतो. तसेच कर्नाटकातील काही भागातून कांदा विक्रीसाठी समितीत येतो. सध्या पंढरपूर, सोलापूर परिसरातील कांदा विक्रीसाठी येत आहे. हा कांदा काही प्रमाणात ओला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नाशिक, कर्नाटक परिसरात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सध्या आवक ज्या प्रमाणात अपेक्षीत आहे त्या प्रमाणात होत नाही. हंगाम सुरू असताना दररोज 40 ते 60 ट्रक कांद्याची आवक होते.  पुढील महिन्यात अहमदनगर, जुन्‍नर, पुरंदर परिसरातून कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी येतील, असा अंदाज यामधील जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.