होमपेज › Kolhapur › शिवाजी पेठेतील एकाचा डेंग्यूने मृत्यू

शिवाजी पेठेतील एकाचा डेंग्यूने मृत्यू

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 22 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी पेठ परिसरात सरनाईक कॉलनी येथील एकाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाला. जीवन दिनकर दीक्षित (वय 49, रा. गुलमर्ग अपार्टमेंट) असे त्यांचे नाव आहे. 

दीक्षित हे कोल्हापुरात एका खासगी कंपनीत नोकरीला होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. त्यामुळे त्यांच्यावर शाहूपुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.  

शिवाजी पेठ आणि रंकाळा तलाव या परिसरात डेंग्यूची मोठ्या प्रमाणावर साथ आहे. रंकाळा तलाव परिसरात अनेक कॉलन्या आहेत. या कॉलन्यांतील घराघरांत एक ते दोन रुग्ण डेंग्यूचे असल्याचे या परिसरातील रहिवाशांनी सांगितले. डेंग्यू साथीचा फैलाव रोखण्यासाठी धूर फवारणी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या वतीने धूर फवारणी केली जाते; पण ती मोटारसायकलवरून केली जाते. मोटारसायकलवरून धूर फवारणीचा फारसा उपयोग होत नसल्याच्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. डेंग्यूच्या डासांचा अटकाव होण्यासाठी सायकलवरून धूर फवारणी करावी, अशी अपेक्षा शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.