होमपेज › Kolhapur › पोलिसांचे पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन

पोलिसांचे पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन

Published On: Aug 14 2019 11:23PM | Last Updated: Aug 14 2019 11:23PM
कोल्हापूर : प्रनितिधी

जिल्ह्याला वेढलेल्या महापुराच्या विळख्यातून पूरग्रस्तांची सुटका करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून दहा-बारा दिवसांपासून अहोरात्र शर्थीने प्रयत्न करणार्‍या कोल्हापूर पोलिस दलाने पूरग्रस्तांना आर्थिक साहाय्याचा निर्धार केला आहे. 

वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन हजारांवर पोलिस एक दिवसाचे वेतन देणार आहेत, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 30 लाखांचा निधी लवकरच  प्रशासनाकडे प्रदान करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील  अगणित पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने कोल्हापूर पोलिस दलांतर्गत तीन हजारांवर घटकांचाही खारीचा सहभाग असेल, असेही ते म्हणाले. 

14  मार्चमध्ये पुलवामा येथील दहशती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान धारातीर्थी पडले होते. त्यात महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांचा समावेश होता. कोल्हापूर पोलिस दलामार्फत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना साथ देत एक दिवसाचा पगार जाहीर करण्यात आला होता. 

संकटाकाळात मदतीला धावून जाण्याची कोल्हापूर पोलिसांची परंपरा आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याची हीच वेळ असल्याने जिल्ह्यातील अधिकार्‍यासह तीन हजारावर पोलिस बांधव एक दिवसाचे वेतन स्वरूपात 30 लाखाचा निधी लवकरच प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.