होमपेज › Kolhapur › प्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी

प्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:53AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंद काळात हुल्लडबाजीसह सार्वजनिक ठिकाणी दगडफेक, तोडफोड तसेच जमावाला चिथावणी दिल्याप्रकरणी दोनही गटातील प्रमुखांसह सुमारे दीड हजार जणांवर शहरातील चारही पोलिस ठाण्यांत गुरुवारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 40 संशयितांची नावे निष्पन्‍न झाली आहेत. दगडफेक, तोडफोडमध्ये सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

संतप्‍त जमावाला चिथावणी देणे, दगडफेक, तोडफोड केल्याप्रकरणी संशयितांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात चार, लक्ष्मीपुरीत दोन, जुना राजवाडा येथे तीन व राजारामपुरी ठाण्यात एक असे एकूण नऊ गुन्हे गुरुवारी सायंकाळपर्यंत दाखल झाले आहेत.

दरोडा, लुटालूट, शासकीय कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला, घातक शस्त्रे बाळगून दहशत माजविणे, बेकायदा रस्ता रोखून धरणे, वाहनांची तोडफोड, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यामध्ये समावेश आहे, असेही शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. दखलपात्र गुन्ह्यात संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.

गुन्हा दाखल झालेल्यांत रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे (शिवाजी पेठ) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे  (कागल), अनिल म्हमाणे (उमा टॉकीजजवळ), अविनाश शिंदे (गडमुडशिंगी), दत्ता मिसाळ (वाशी), सोमनाथ घोडेराव (राजेंद्रनगर), गुणवंत नागटिळे (राजेंद्रनगर), विश्‍वासराव देशमुख (कोल्हापूर), बाजीराव नाईक (शिवाजी पेठ), शेखर सनदे (सदर बाजार), सखाराम कामत (शिये), दगडू भास्कर (कुडित्रे), सुशील कोल्हटकर (सिद्धार्थनगर),  

सुखदेव बुद्धीहाळकर (राजेंद्रनगर), बाळासाहेब भोसले (राजारामपुरी), सुभाष देसाई (कोल्हापूर), सुरक्षा सोहणी (सिद्धार्थनगर), नीलेश आनंदा बनसोडे (विचारेमाळ), वसंत लिंगनूरकर (सिद्धार्थनगर), वर्षा संजय कांबळे (कसबा बावडा), संजय बळीराम कांबळे (सिद्धार्थनगर), मोहन शेखर सनदे (विचारेमाळ), विकी कांबळे (सुभाष रोड), बबन सावंत (कनाननगर), जितू कांबळे (गडमुडशिंगी), श्रीमंत कांबळे, सागर कांबळे (गांधीननगर) सतीश माळगे (उचगाव), अंकुश वराळे (वळिवडे), सद्दाम रज्जाक महाराज, लखन कांबळे (गांधीनगर) यांचा समावेश आहे, असेही डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

गुन्हे दाखल झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांत तानाजी पाटील, अमर झाड, विजय करजगार, शिवानंद स्वामी, गणेश देसाई, सुमित चौगुले, केदार भुरके, सागर साळोखे, शरद माळी (रा. सर्व कोल्हापूर) आदींचा समावेश आहे, असेही पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले.

आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

जमावाने केलेल्या तोडफोडप्रकरणी चारही पोलिस ठाण्यात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. बंगले, व्यापारी पेढ्या, हॉटेल्स, व्यावसायिक फर्मवरील दगडफेकीत आर्थिक झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे आणखी किमान पंधरा-वीस गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.

संशयितांवर कठोर कारवाई करणार : मोहिते

सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह सरकारी अधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍या समाजकंटकाविरुद्ध महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले.

पुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेज सादर करावेत

कोल्हापूर बंद काळात हुल्लडबाजांनी प्रचंड दहशत माजवून सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान केल्याने उपद्रवी व्यक्‍तींच्या कृत्यांचे सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज असल्यास पोलिस ठाण्यांकडे सादर करावे, संशयितांना कठोर शिक्षा होण्यासाठी फुटेज महत्त्वाचे पुरावे ठरू शकतील, असेही डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले.

आवश्यकता भासल्यास जादा कुमक

शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर गृहखात्याने करडी नजर ठेवली आहे. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजकंटकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पोलिस महासंचालकांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास पुरेसा फौजफाटाही सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सांगण्यात आले.

पोलिस महासंचालकांना अहवाल

पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडून तपशीलवार आढावा घेतला. बुधवारी दिवसभर घडलेल्या घटनाक्रमाचा अहवालही पोलिस महासंचालकांना गुरुवारी सकाळी सादर करण्यात आला.