Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Kolhapur › दीड हजार कि.मी. रस्त्यांवर एकदाही डांबर नाही

दीड हजार कि.मी. रस्त्यांवर एकदाही डांबर नाही

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:09AMकोल्हापूर : विकास कांबळे

सधन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अजूनही फार वाईट आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दीड हजार किलोमीटरच्या रस्त्यांवर देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकदाही डांबर पडलेले नाही. या रस्त्यांसाठी साधारणपणे चारशे कोटींची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री कोल्हापूरचे असल्याने जिल्ह्यातील या रस्त्यांचे भाग्य उजळण्याचे त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

जिल्ह्यात डोंगरी भागातील वाड्या-वस्त्यांची संख्याही अधिक आहे. यातील अनेक वाड्या-वस्त्या रस्त्यांच्या सुविधेपासून वंंचित आहेत. रस्ते नसल्यामुळे काही वाड्या-वस्त्यांवरील लोकांना मुख्य रस्त्यांपासून चार ते पाच किलोमीटर आजही चालत जावे लागते. दळणवळणाची सोय नसल्यामुळे या वाड्या-वस्त्या नागरी सुविधांपासूनदेखील लांब आहेत. त्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी शासनाच्या वतीने पंतप्रधान सडक योजनेसारख्या योजना सुरू करण्यात आल्या. सरकार बदलल्यानंतर योजनेचे नाव बदलून त्या सुरू ठेवण्यात आल्या. मात्र, या योजना आपले लोकप्रतिनिधी मतदारांची संख्या अधिक असेल अशाच गावांमध्ये राबवताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1 हजार 482 रस्त्यांवर एकदाही डांबर पडलेले नाही. याशिवाय 285 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे एकदाही डांबरीकरण झालेले नाही. यावरून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचे चित्र स्पष्ट होते. केवळ दुर्गम, डोंगराळ भागातील रस्त्यांचेच असे चित्र नाही, तर शहरालगत असलेल्या करवीरसारख्या तालुक्यातीलही काही गावांमधील रस्त्यांवर एकदाही डांबर पडलेले नाही.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आपल्या मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळावा, म्हणून प्रयत्न करत असतात. मात्र, त्यांना मिळणारा निधी अतिशय तुटपुंजा असतो आणि मतदार संघात येणार्‍या गावांची संख्या अधिक असते. त्यामुळे इच्छा असूनदेखील ते मतदार संघातील रस्ते व गटारींची सर्व कामे करू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यांची कामे होऊ शकली नाहीत. जिल्ह्यात ग्रामीण भागात 5 हजार 825 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी 3 हजार 983 किलोमीटरचे रस्ते गावातील व 1 हजार 841 किलोमीटरचे रस्ते जिल्हा मार्ग आहे. जिल्हा मार्गांची अवस्थाही फार वाईट आहे.