Tue, Apr 23, 2019 06:03होमपेज › Kolhapur › ‘राजर्षी शाहू’ विचार कार्याचा वारसा जपणारे पाईक

‘राजर्षी शाहू’ विचार कार्याचा वारसा जपणारे पाईक

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 1:14AMकोल्हापूर : सागर यादव 

‘हिरे माणके-सोने उधळा जय-जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा...’ केवळ अशा शब्दातच कोल्हापूरनगरीचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वर्णन होऊ शकते. राजर्षी छत्रपती शाहूंचे विचार व त्यांच्या कार्याचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शाहू’ विचारांचे अनेक अनुयायी व्यक्ती-संस्था-संघटना सक्रिय आहेत. वर्षातून जयंती किंवा पुण्यतीथीपुरती शाहूंची आठवण न काढता वर्षभर शाहू कार्याचा जागर या लोकांकडून सुरू असतो. आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने अशा शाहू कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...

राजर्षी शाहू संशोधन केंद्र

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रातर्फे वर्षभर राजर्षी शाहूंच्या इतिहासाविषयी संशोधन कार्य सुरू असते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक संशोधक डॉ. देविका पाटील व  सचिन घोरपडे व सहकारी या विभागात सक्रिय आहेत. या केंद्रात राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भातील वस्तू, कागदपत्रे, छायाचित्रे, पुस्तके यांचे जतन-संवर्धन-संरक्षण करण्यात आले आहे. केंद्रातर्फे ‘राजर्षी शाहू पेपर्स’ हा 9 खंडांचा इतिहास, लठ्ठेकृत शाहूचरित्र असे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे अखंड कार्य सुरू आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातूनही शाहू कार्याच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे. विविध परदेशी आणि प्रादेशिक भाषेतून शाहू चरित्राच्या निर्मितीचे अद्वितीय कार्य त्यांनी सुरू ठेवले आहे. यासाठी त्यांना शाहू महाराज, खा. संभाजीराजे व मालोजीराजे यांचे सहकार्य मिळत आहे. 

सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र

सह्याद्री इतिहास संशोधन केंद्रातर्फे राजर्षी शाहूंनी केलेल्या कार्यावर सातत्याने अभ्यास व संशोधनाचे कार्य सुरू आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याचा अप्रकाशीत इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी या केंद्रातर्फे प्रयत्न केले जातात. विविध प्रकारची प्रदर्शने, व्याख्याने असे उपक्रम आयोजित करून त्या माध्यमातून शाहू कार्याचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविला जातो.  यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मोडी अभ्यासक अमित आडसुळे, उत्तम नलवडे, किरणसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याला अ.भा. मराठा महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, अवधूत पाटील अशा व्यक्ती-संस्थांचे सहकार्य मिळत आहे. 

मानवतावादी विचारांचे ‘अग्निदिव्य’

शंभर वर्षांपूर्वी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातील वैचारिक संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवून आजच्या बुद्धिजीवी पिढीला मानवतावादी विचाराबद्दल सजग करण्याच्या उद्देशाने ‘अग्निदिव्य’ या राजर्षी शाहूंवरील नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूप्रेमी विचार मंचच्या सहकार्याने काळम्मावाडी येथील श्री हनुमान तरुण मंडळातर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. दोन अंकी नाटकाची निर्मिती सुनील माने यांची असून, लेखन अशोक पाटोळे यांनी तर दिग्दर्शन प्रकाश पाटील यांचे आहे. वर्षभर या नाटकाचे सादरीकरण ठिकठिकाणी करून त्या माध्यमातून शाहूंचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचे कार्य हे लोक करत आहेत. 

मानसिंगचा मोटारसायकलवरून राज्यभर प्रवास

लोकराजा राजर्षी शाहूंनी केलेल्या कार्याची माहिती उद्याच्या देशाचे भविष्य असणार्‍या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मानसिंग विष्णू पाटील (वय 35) या युवकाने अनोखी मोहीम फत्ते केली आहे. सन 2006 ते 2011 या कालावधीत विदर्भ वगळून अवघ्या महाराष्ट्रभर मानसिंगने आपल्या मोटारसायकलवरून प्रवास केला. प्रा. डॉ. नानासाहेब साळुंखे लिखीत ‘शाहूंच्या आठवणी’ हा तब्बल 260 पानांचा ग्रंथ अवघ्या अल्प किमतीत त्याने उपलब्ध करून दिला आहे. आजपर्यंत या पुस्तकाच्या दीड लाख प्रती मानसिंगने वितरित केल्या आहेत.    

लोकराजा फोरम

राजर्षी शाहू कार्याचा वारसा जगभर पोहोचावा, या उद्देशाने कोल्हापुरातील समविचारी तरुणांनी एकत्रित येऊन ‘लोकराजा फोरम’ ही संस्था सुरू केली आहे. या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. सोशल मीडियावरून जनजागृती केली जाते. कलानगरी कोल्हापूरचा नावलौकीक जपण्याच्या उद्देशाने फोरमतर्फे चित्रमय शाहूचरित्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठान

भावी पिढी सक्षम-निर्व्यसनी व्हावी, रांगड्या कुस्तीसारख्या मर्दानी खेळाचे जतन व्हावे, या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील पेठापेठात तालीम परंपरा निर्माण केली. या परंपरेचे संरक्षण व्हावे. तालीम संस्थांच्या वतीने शाहू कार्याचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठीच्या जनजागृतीसाठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. पै. बाबा महाडिक, हिंदुराव हुजरे-पाटील, राजू सावंत, संग्राम यादव व सहकारी यासाठी सक्रिय असतात.

शाहूप्रेमी संस्था-संघटना

 ‘शाहू चरित्रकार’ डॉ. रमेश जाधव, माजी महापौर भिकशेठ पाटील, इतिहास अभ्यासक राम यादव, पुराभिलेखाधिकारी केशव जाधव, गणेशकुमार खोडके, डॉ. मंजुश्री पवार, शाहीर राजू राऊत, रंगराव पाटील, दिलीप सावंत, आझाद नायकवडी या व्यक्तींसह सह्याद्री प्रतिष्ठान, शिवराज्य मंच, सत्यशोधक समाज, शाहू वैदिक स्कूल, शाहू संगीत विद्यालय, कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद, शाहू फौंडेशन, शाहू ट्रस्ट, शाहू विचार परीक्षा उपक्रमाचे जावेद मुल्लाणी आदींनी शाहू कार्याचा लोकोपयोगी वारसा आपापल्या पद्धतीने अखंड जपला आहे.